‘मी हुकुमशहा असतो तर पहिलीपासून महाभारत, भगवद्गीता लागू केली असती’

0
114

 सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दवे यांचे उद्गार
‘मी जर भारताचा हुकुमशहा असतो तर देशात पहिल्या इयत्तेपासून गीता व महाभारत पाठ्यपुस्तकात लागू केले असते’ हे उद्गार आहेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. आर. दवे यांचे. ‘वर्तमान स्थितीतील समस्या आणि जागतिकीकरणाच्या काळातील मानवी हक्कांसमोरील आव्हाने’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेवेळी न्याय. दवे यांनी आपल्या भाषणात हे उद्गार काढले.
गुजरात लॉ सोसायटीतर्फे आयोजित या परिषदेत न्या. दवे म्हणाले की, भारतीयांनी पुन्हा प्राचीन परंपरांकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच बाल वयातच महाभारत व भगवद्गीता यामधील पाठ लागू करावे लागतील. आमची प्राचीन गुरु-शिष्य परंपरा लोप पावली आहे. ती आज असती तर हिंसाचार व दहशतवाद यासारख्या समस्या देशात निर्माण झाल्या नसत्या असा दावा त्यांनी केला.
आता आपण विविध देशांमधील दहशतवाद पाहत आहोत. त्या देशांपैकी बहुतेक देश लोकशाही प्रधान आहेत. लोकशाही देशात प्रत्येकजण चांगला असेल तर ते साहजिकच जो कोणी उत्तम असेल त्याला निवडून देतील आणि ती व्यक्ती अन्य कोणाचे नुकसान करण्याचा विचारही करणार नाही. असे ते म्हणाले.
महाभारत व भगवद्गीता यांच्या अध्ययनाने जीवन कसे जगावे याचे शिक्षण मिळते. म्हणूनच पहिल्या इयत्तेपासून त्यांचा अंतर्भाव करावा. मात्र तथाकथित निधर्मी व्यक्तींना हे मान्य नसेल असेही ते म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांचेही यावेळी भाषण झाले.