म्हापसा येथील लिबर्टी अपार्टमेंट समोर असलेल्या जुन्या दुमजली इमारतीचा उत्तरेकडचा काही भाग शुक्रवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही ही इमारत म्हापसा पालिका कार्यालयापासून काही अंतरावर असूनही पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत आहे.
पूर्वी या इमारतीला पहिल्या मजल्यावर नागरीपुरवठा खात्याचे कार्यालय होते. तळमजल्याच्या उत्तरेकडील भागात उपकोषागार होते. बाजूला प्रशांत तेंडूलकर यांचा ईकॉनॉमिक प्रिटींग प्रेस आहे. त्याच्या बाजूला रघुनाथ देसाई यांचे ‘कासा देसाई’ हे दुकान आहे. गोवा सरकारने सरकारी कार्यालय संकुलाचे बांधकाम केल्यानंतर नागरीपुरवठा कार्यालय व उप कोषागारच्या कार्यालयाचे या संकुलात स्थलांतर करण्यात आले.
यातील प्रशांत तेंडूलकर यांचा छापखाना व कासा देसाई या दुकानाचा इमारतीचा भाग वगळता इमातीच्या पहिला मजला व उपकोषागाराचा भाग गेल्या बर्याच वर्षापासून वापराविना आहे. ही इमारत ग्लेडी ब्रागांझा कुटुंबियांच्या मालकीची असून हे कुटुंब इंग्लंडमध्ये स्थानिक झाले आहे. केअर टेकर म्हणून सायश मालदार हिची नेमणूक केली आहे. ङ्गफाजेंदाफची इमारत म्हणून ओळखल्या जाणार्या या इमारतीच्या तळमजल्याचा काही भाग व पहिला मजला व बरीच वर्षे वापरा विना पडून राहिल्याने इमारतीचा उत्तरेकडील भाग जीर्ण झाला होता. भींतीवर पिंपळाचे मोठे झाड वाढले होते. झाडाची पाळे भिंतीत खोलवर शिरल्याने भिंतीला तडे गेले होते. गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे इमारतीच्या भींतीत पाणी घुसले व भिंत फुगून काल रात्री ती कोसळली.
या घटनेची महिती मिळताच काल सकाळी उपमुख्यमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा येंनी नगराध्यक्ष संदीप फळारी यांच्याशी संपर्क साधून इमारतीची पाहणी करून सुरक्षा उपाय करण्याची सूचना केली. त्यानुसार नगराध्यक्ष संदीप फळारी, पालिका मुख्याधिकारी राजू गावस, कनिष्ठ अभियंता रेश्मा सातार्डेकर यांनी बाजार निरीक्षक संतोष डांगी, विकास कांबळीसह इमारतीच्या कोसळलेल्या भागाची पाहणी केली. नगरसेवक सुधीर कांदोळकर माजी नगरसेवक रायन ब्रागांझा रोहन कवळेकर, हे घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली.
इमारतीचा काही भाग कोसळल्याने इमारत धोकादायक बनली आहे व ती आणखी कोसळण्याचा धोका आहे. यामुळे इमारतींच्या मालकाला तसेच इमारतीमध्ये असलेल्या दोघा भाडेकरूंवर कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार आहे व त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष फळारी यांनी दिली. पालिका क्षेत्रात घातक स्थितीत असलेल्या इमारतीचे मालक व भाडेकरूवर पूर्वी नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या व स्पष्टीकरण घेण्यात आले होते. आता पुन्हा नोटीसा बजावण्यात येतील. काल रात्री कोसळलेली इमारतही घातक इमारतीच्या यादीत आहे.