तीन मार्गांवर रेल्वे लाईनसाठी सरकारचा विचार : ढवळीकर

0
205

जुवारी पुलाची जानेवारी अखेरीस कोनशीला
रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सावर्डे-फोंडा, मडगांव-फोंडा, वाळपई -थिवी अशा मार्गांवर रेल्वे लाईन जोडण्याचा सरकारचा विचार असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे वाहतूकमंत्री या नात्याने सुदीन ढवळीकर यांनी काल विधानसभेत मागण्यावेळी चर्चेच्यावेळी सांगितले.
सध्या गोव्यात दहा लाख वाहनांची नोंदणी झाली असून चालू एकाच वर्षात ७० हजार नव्या वाहनांची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले. जलद ट्रेन सेवा सुरू केल्यास प्रवाशांची चांगली सेवा होऊ शकेल व रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होईल.चाळीसही आमदरांनी पाठिंबा दिल्यास ताबडतोब राज्याच्या सर्व भागात दुचाकी स्वारांसाठी व मागे बसलेल्यांनाही हेल्मेट सक्तीचे करण्याची घोषणा ढवळीकर यांनी केली. त्यासाठी दोन महिने जागृती करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी ढवळीकर यांना दिला.
जुवारी पुलाची कोनशीला जानेवारी अखेरपर्यंत
येत्या जानेवारी अखेरपर्यंत जुवारी पुलाची कोनशीला बसविण्याची घोषणा साबांखामंत्रबी सुदीन ढवळीकर यांनी काल आपल्या मागण्यांवरील चर्चेस उत्तर देताना सांगितले. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर केल्याची माहितीही ढवळीकर यांनी सभागृहाला दिली. जुवारी पुलाला सध्या तरी कोणताही धोका नसून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पूल बळकट करण्याचे काम केले आहे. त्यामुळे पुलाच्या बाबतीत अफवा पसरवू नये, असे आवाहन त्यांनी केले. या पुलाची तपासणी करण्यास गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाला सांगितले आहे. त्यांचा तपासणी अहवालही लवकरच मिळेल, असेही ढवळीकर यांनी सांगितले.