उमेदवार निवडीत घोटाळा प्रकरण
गोवा सार्वजनिक सेवा आयोगातील (जीपीएससी) कनिष्ठ श्रेणी अधिकार्यांच्या निवड प्रक्रियेत हेराफेरी व कट कारस्थान रचल्याप्रकरणी राज्य प्रशासनाने जीपीएससीचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश देसाई, सचिव तुकाराम सावंत निवड प्रक्रियेतील नऊ उमेदवार व अन्य यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक पोलीस विभागाकडे (एसीबी) गुन्हा नोंद केला आहे.
२०११-१२ या काळात जीपीएससीमधील कनिष्ठ श्रेणी अधिकार्यांची पदे भरण्यासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत घोटाळा केल्याचा ठपका वरील सर्वांवर गुन्हेगारी दंड संहिता क्र. १३/२०१४, भा. दं. सं.च्या कलम १२०(बी) व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ए/०७/२०१४ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राज्य सचिवालयातील अवर सचिव रहमतुल्ला आगा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
निवड प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांमध्ये हेराफेरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वरील अधिकार्यांबरोबरच उमेदवार तुषार तानाजी हळर्णकर, ब्रुसली जीझस नाझारियो सावियो क्वाद्रूस, प्रवीण प्रकाश शिरोडकर, नीलेश भगवंत नाईक, अरविंद भानुदास खुटकर, आनंद शाणू वेळीप, दौलतराव विजयराव राणे सरदेसाई, व्यंकटेश नंदा सावंत यांच्या नावांचा या प्रकरणात समावेश आहे. या प्रकरणी तपास काम सुरू झाले आहे.