पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात बुधवारी प्रलयंकारी पावसामुळे डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बळींची संख्या ४१ झाली आहे.
गावातील मतदतकार्य काल गुरुवारीही सुरू ठेवण्यात आले होते. विविध ठिकाणच्या चिखल व ढिगार्यांखाली अजून सुमारे १५० जण दबले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या दुर्घटनेत सापडलेल्या आठ जणांना वाचविण्यात आले आहे. ४० घरे या दुर्घटनेत वाहून गेल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाचे ३८० जवान मदतकार्यात गुंतले आहेत. ही मोहीम आणखी ४८ ते ७२ तास चालू ठेवावी लागेल अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, काल माळीण गावाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत पंतप्रधान निधीतून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रशासनाने पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांमधील दरड कोसळण्याची पार्श्वभूमी असलेल्या भागांची पाहणी करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.