विदेशी गुन्हेगारांना मायदेशी पाठवू : मुख्यमंत्री

0
152

वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली ताब्यात घेतलेल्या विदेशी नागरिकांना पोलीस बंदोबस्त ठेवून संक्रमण छावण्यांमध्ये ठेवण्याची व्यवस्था करून नंतर त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गृहमंत्री या नात्याने विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांच्या प्रश्‍नावर काल विधानसभेत दिले.
काही विदेशी नागरिक कुठल्या देशाचे नागरिक आहेत हे कळण्यासाठी आवश्यक असलेले पासपोर्टही त्यांच्याकडे नसतात. काहींच्या चेहर्‍यावरून दक्षिण आफ्रिकेतील असल्याचा अंदाज काढला जातो, असे पर्रीकर म्हणाले.
कोणत्याही गुन्ह्याखाली अटक केलेल्या या लोकांना जामिनावर सोडल्यानंतर किंवा तुरुंगात असताना मायदेशी पाठविता येत नाही, ही सर्वात मोठी अडचण असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
भारतात येणार्‍या विदेशी नागरिकांच्या प्रवेशाची नोंदणी ठेवणारी यंत्रणा ही कमकुवत आहे. त्यासाठी केंद्राच्या मदतीने कायद्यात दुरुस्ती करून घ्यावी लागेल, आपण त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
गोव्यात येणारे काही विदेशी नागरिक येथे बेकायदेशीर म्हणजे अमलीपदार्थांचा गैरव्यवसाय करतात व पर्यटन व्यवसायाचे नुकसान करतात, असा आरोप राणे यांनी केला. हॉटेलमध्ये उतरणार्‍या विदेशी किंवा देशी नागरिकांची माहिती नोंद करून ठेवणे सक्तीचे आहे. त्यानुसार तपासणीही केली जाते. नव्या पोलीस कायद्यात या नियमांचे पालन न करणार्‍यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद असेल. त्याचप्रमाणे ओळखीची माहिती न ठेवता भाडेकरू म्हणून ठेवून घेणार्‍या घर मालकांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.