मंदिरे फोडणारी टोळी डिचोलीत गजांआड

0
176

डिचोली व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरे फोडून चोरी करण्यासाठी वावरणार्‍या टोळीला गजांआड करण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. टोळीतील अटक केलेल्या चार जणांपैकी तिघेजण अल्पवयीन असल्याचे निरीक्षक रुपेंद्र शेटगावकर यांनी सांगितले. सदर टोळीचा छडा लावण्यासाठी पोलीस सुरेंद्र केरकर यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली, असेही सांगण्यात आले. सर्वांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून दररोज रात्रीच्यावेळी मंदिरे फोडण्याचा त्यांचा बेत असायचा. मंदिराभोवती सापळा रचून मंदिरे फोडण्यात येत होती. त्यांनी मये येथील सातेरी देवस्थान, नार्वे येथील शांतादुर्गा देवस्थान, पिळगाव येथील महादेव मंदिरही फोडले होते. तसेच डिचोली बाजारातील मंदिरही फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. रात्रीच्या वेळी मंदिरे फोडण्याबरोबरच दिवसाढवळ्या दुपारी मंदिरात कोण नसल्याची संधी साधून फंडपेट्या फोडण्याचे प्रकारही त्यांनी केलेले आहे. हिराला किंवा बारीक काठीला चिंगम लावून फंडपेटीतील कागदी पैसे कसे काढले त्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी करून दाखविल्याचे पोलीस स्थानकातून सांगण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून डिचोलीत रात्री व भरदिवसाही होणारी मंदिर फोडी तसेच फंडपेटी फोडी या प्रकरणांमुळे डिचोली पोलीस हैराण झाले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस सुरेंद्र केरकर यांनी निरीक्षक रुपेंद्र शेटगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती गोळा केली. याकामी केरकर यांना समीर गावस व प्रसाद गाड, सखाराम गावकर तसेच निलेश फोगेरी, हवालदार बाबाजी आजगावकर यांची साथ लाभली.
संपूर्ण माहिती मिळवून अटक करण्यात आलेल्या सदर चोर्‍यांमध्ये हात असल्याचे सिद्ध झाल्यानंतर निरीक्षक रुपेंद्र शेटगावकर यांच्यासह उपनिरीक्षक तुकाराम वाळके, विठ्ठल माजीक, हवालदार बाबाजी आजगावकर, निलेश फोगेरी, सखाराम गावकर, प्रसाद गाड, समीर गावस व सुरेंद्र केरकर यांनी चारजणांना ताब्यात घेतले. त्यापैकी तीन जण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले.