आत्महत्या हा मानसिक ताणावर उपाय नव्हे

0
391

– उदय सावंत
आत्महत्येच्या प्रकरणांनी सध्या सत्तरी तालुका पूर्णपणे हादरून गेला आहे. तसे पाहायला गेलो तर अनेक ठिकाणी आत्महत्या होतात, मात्र तीन महिन्यांत सत्तरीतील तीन महिलांनी केलेल्या आत्महत्या खरोखरच खोलवर विचार करायला लावणार्‍या आहेत. यामध्ये पिसुर्लेतील उपसरपंच सौ. वैभवी यांनी विषप्राशन करून, मासोर्डे येथील वेदश्री हिने आपल्या चार वर्षीय मुलीसोबत नदीत उडी टाकून व मोर्ले-सत्तरी येथील नीता गावस व सुजाता गावस यांनी आमोणा पुलावरून नदीत उडी टाकून आत्महत्या केल्या. त्यात सुजाता गावस हिचा जीव वाचवण्यात यश मिळाले असले तरी हा सारा प्रकार दुर्दैवी आहे.
या तिन्ही प्रकरणांमधील आत्महत्यांची कारणे भिन्न असली तरी महिलांच्या या अनाकलनीय कृत्यांनी समाजासमोर नवीन स्वरूपाच्या समस्या उभ्या केल्या आहेत हे नक्की! सध्या तरी वैभवी दुमाणे हिच्या आत्महत्येमागचे कारण कळू शकलेले नाही. तरीसुद्धा या प्रकरणी समाजबांधवांनी घेतलेली नरमाईची भूमिका सर्व स्तरांवर साशंकता निर्माण करणारी आहे.
सध्या गाजत असलेल्या वेदश्री परब व यशश्री परब आत्महत्या प्रकरणाने वातावरण बरेच तापलेले आहे. लग्नानंतर सहा वर्षांपासून वेदश्री परब यांच्या पती, सासू व सासरे यांच्याकडून होणार्‍या मानसिक छळामुळे त्यांनी आपल्या ४ वर्षाच्या मुलीसह आपली जीवनयात्रा संपवली, असा तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे. आपली मानसिकता बदलल्याने अशी आत्महत्येची प्रकरणे जगासमोर येऊ लागली आहेत. सुनेला सासरच्यांकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रकार बर्‍याच वर्षांपासून या देशात घडत आहेत. तरीही सामाजिक विचारसरणी बदललेली नाही. लग्नानंतर सुनेला पाण्यात पाहण्याची सासूची वृत्ती व सासूला पाण्यात पाहण्याची सुनेची प्रवृत्ती यामुळे होणार्‍या परिणामांचा शेवट आत्महत्येत होतो असा समज दुर्दैवाने समाजात फोफावत आहे. सुनेच्या बिघडणार्‍या नात्याचे अनेक दुष्परिणाम समाजात जन्माला येऊ लागले आहेत. त्यातील महत्त्वाचा परिणाम म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. आपल्या पत्नीचे सासूसोबत पटत नसल्याने आपल्या पत्नीला घेऊन वेगळा संसार थाटण्याच्या विचाराचा जन्म होतो.
काही वेळा सुनेचा छळ होताना तिच्या सासू-सासर्‍यांबरोबरच पतीचीही त्यांना साथ असते. त्यामुळे स्त्री हतबल होते व तिच्यावरील मानसिक दडपण वाढते. महिला जास्त भावुक असतात. त्यांच्यात पुरुषांपेक्षा सहनशक्ती जास्त असली तरी तिच्या सहनशीलतेचा अंत कधी ना कधी होतोच. त्यामुळेच ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
महिलेचा होणारा मानसिक वा शारीरिक छळ, तिच्यावरील वाढणारा मानसिक ताण-तणाव या संबंधात तिला समजावण्याचा प्रयत्न तिच्या सहकारी, मित्रमंडळींकडून होण्याची गरज असते. महाराष्ट्रात काही ठिकाणी अशा महिलांसाठी काही संस्था कार्यरत आहेत, ज्यात महिलेच्या मानसिक तणावावर उपाययोजना किंवा मानसिक तणाव हलका करण्यासाठी उपाय केले जातात. तसे प्रयत्न गोव्यात होत आहेत, असे वाटत नाही. यामुळे आत्महत्येसारखे दुर्दैवी प्रकार जन्माला येतात.
वेदश्री परब हिच्या बाबतीत असेच घडलेले आहे, हे नाकारून चालणार नाही. पाच वर्षांपासून पती व सासू-सासरे यांच्याकडून होणार्‍या त्रासांत झालेली कथित वाढ व कुणाकडूनही आधार मिळाला नसल्यामुळे तिच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय तिला दिसला नाही व तिने आपली जीवनयात्रा संपवली.
चार दिवसांपूर्वी मोर्ले-सत्तरी येथील गावस बहिणींना त्यांच्या भावाने त्रास दिल्या कारणाने आत्महत्या करण्याच्या केलेल्या प्रयत्नात नीता गावस हिचे निधन झाले तर सुजातावर गोमेकॉत उपचार होत आहेत. बहिणीच्या चांगल्या भवितव्याचा किंवा भविष्याच्या दृष्टीने बहिणीचा पाय वाममार्गाकडे वळणार नाही याची जबाबदारी वडील नसल्याने भावाकडेच येते. शिवाय आईवरही असतेच. अशाच विचारातून गावस बहिणींचा भाऊ कोणत्यातरी कारणास्तव त्यांना समजाविण्यास गेला असेल तर लगेच त्यांना आत्महत्या करण्याची गरज होती का? असे असेल तर कोणताही भाऊ आपल्या बहिणींच्या भवितव्याकडे हताशपणे पाहत राहणार!
कुंभारखण येथील वैभवी दुमाणे हिने केलेल्या आत्महत्येचे कारण आजही गुलदस्त्यात असले तरी तिच्यावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाढता दबाव असणार, हे सत्य नाकारता येत नाही. या तिन्ही प्रकरणांचा अभ्यास केला तर त्यांच्या मनावर येणारे मासिक दडपण वाढल्यामुळे त्यांनी हा मार्ग स्वीकारला असे निदर्शनास येते. सामाजिकदृष्ट्या विचार केल्यास खरेच त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नव्हता काय? या प्रश्‍नावर महिलांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपला विशेषतः सत्तरीतला महिला वर्ग भरपूर प्रमाणात कमी पडत आहे, हे नाकारून चालणार नाही. कारण महिलांच्या सुख-दुःखावर विचार होऊन तिला मानसिक आधार देणारे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. तसेच महिलांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणेही तितकेच गरजेचे आहे.
परंतु असे करण्याची आपली मानसिक तयारी काही प्रमाणात कमी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रणय पाडलोस्कर, वेदश्री परब प्रकरणात मासोर्डेच्या महिलांनी घेतलेली भूमिका निश्‍चितपणे स्वागर्ताहच आहे. पण ती भूमिका घडलेल्या घटनेसंदर्भात व्यक्त झालेली आहे. मात्र असे नेहमी होता कामा नये. यावर सामाजिकदृष्ट्या व्यापक विचार करण्याची व त्यासाठी महिला संघटना सक्रिय होण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
यासाठी अनेक महिला आपले स्वत्व सिद्ध करू शकतात असे वाटते. समाजातल्या चार महिला एकत्र आल्यास समाजात महिलांच्या कल्याणासाठी, प्रगत विचारांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. यासाठी सर्व गावांतल्या सक्षम महिलांची फळी उभारून महिलांच्या मनात जिद्द निर्माण केल्याशिवाय वेदश्री, नीता, वैभवी यांसारख्या मानसिक दडपणाने भांबावलेल्या महिलांच्या आत्महत्या थांबवता येणार नाहीत.