यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति …

0
298

– प्रा. रमेश सप्रे

आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते.. आपला अनुभवही तसाच असतो की इतकी वर्षं उपासना-भक्ती करूनही जीवनात, स्वभावात, संसारात अपेक्षित बदल घडत नाही. साध्या आपल्या कुटुंबातील व्यक्ती आपल्या मनासारखं वागत नाहीत. आपले सहकारी आवश्यक ते सहकार्य देत नाहीत. इतकंच काय पण आपल्या स्वतःच्या जीवनातही हवं त्याप्रमाणे काहीही घडत नाही. अशा तक्रारीनंतर आपण हे ही म्हणतो, ‘सारे उपाय करून पाहिले. निरनिराळ्या देवदेवतांची उपासना केली, उपवास केले, व्रतं केली, तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या इ. इ…. पण सगळं नको तेच घडत गेलं अन् अजूनही घडतंय.

ही सामान्य माणसाची जीवनकहाणी युगानुयुगं चालत आलीय. गीतेसारख्या महान ग्रंथात सर्वकाळासाठी मार्गदर्शन असतं. त्यांतील समुपदेशन कधीही कालबाह्य किंवा कालविसंगत होत नाही.
या सार्‍या विचारसरणीच्या मुळाशी दोन चुकीच्या कल्पना आहेत. एक आपली देवाबद्दलची नि दुसरी उपासना किंवा भक्तीबद्दलची. देवाबद्दलच्या वेदकालीन (वैदिक) नि पुराणकालीन कल्पनेत फरक आहे. उपनिषदातील ऋषी अनेक मुखं, हात असलेल्या सगुणसाकार देवाची पूजा करा असं सांगत नाहीत तर देव नावाची जी शक्ती वा जे चैतन्य आहे त्याची उपासना, ती शक्ती वा चैतन्य व्यक्त होते त्या ॐकारातून करा. मौन, मनन, चिंतन, ध्यान, स्मरण (नाम), शरण, समर्पण या भावनेनं त्या शक्तीशी एकरूप होण्याचा अभ्यास करा. जीव (व्यक्ती) व शिव (शक्ती) यांचं मिलन होऊ द्या. हीच खरी उपासना.
असा ॐ प्रत्येक वेळी नवीन असतो म्हणून त्याला ‘प्रणव’ असं नाव दिलं नि तो सतत उत्स्फूर्तपणे एखाद्या गीतासारखा स्फुरण पावत असतो. म्हणून त्याला ‘उद्गीत’ म्हणून त्याच्या स्मरणध्यानात अखंड राहणं हीच खरी उपासना. यात मन-बुद्धी सदैव शक्तिमय, नितनूतन म्हणून अखंड आनंदात राहण्याची आणि समाधानात ठेवण्याची सहज साधना साधते. भगवंताला असं मुक्त मन नि चैतन्ययुक्त जीवन अपेक्षित आहे. पण आपला अनुभव काय आहे? आपण क्वचितच मुक्त आनंदाचा, उत्स्फूर्त चैतन्याचा अनुभव घेतो. एरवी आपण खूप दूर असतो – मनःशांती – स्थिरबुद्धी – चित्तशुद्धी यापासून. खरं पाहिलं तर या गोष्टी आपल्या आत असल्याने आपला त्यांच्यावर पूर्ण अधिकार आहे, आपण आनंद मिळवण्याबाबतीत पूर्ण स्वतंत्र आहोत.. आनंद हा आतून अखंड उसळत असतो. तो बाहेर दिसतो पण आतच असतो. अंतरंगीची वस्तू असल्यानं आनंद बाहेर निर्माण करता येत नाही. चिखलातून उगवलेलं, शेवाळ्यानं लडबडलेलं कमळ पाहून भक्ताचं हृदय आनंदानं नाचू लागतं. त्याचवेळी एखाद्या तर्कशास्त्री पंडिताला त्या कमळाच्या बाजूचं शेवाळं (मॉस) नि मुळातला चिखल पाहून दुःख होतं. तो कमळाचा आनंद लुटू शकत नाही. ते कमळ भगवंताला किंवा सद्गुरूंना अर्पण करावं हा विचार त्याला सुचत नाही.. चिखलातून कमळ ‘कसं’ फुललं याचा विचार करून आनंदात कर्म करण्याची प्रेरणा न मिळवता मुळात चिखल ‘का’ याचा विचार करत तो गंभीर बनून जातो. जीवनातून अखंड उसळणारा अक्षय आनंद दूर सारून जीवनातील दुःखांवर चिंतन व चिंता करत अवघं आयुष्य वाया घालवतो.
भगवान श्रीकृष्ण स्वतः रसिकतेनं जीवन भोगणारा व उपभोगणारा आहे. दुःखांचे गोवर्धन आनंदाच्या करंगळीने उचलून स्वसंरक्षण व इतरांचं रक्षण करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. त्याचं या संदर्भात म्हणजे आनंदी जीवनाच्या संदर्भात गीतेतलं समुपदेशन सर्व काळासाठी व सर्व संस्कृतीतील लोकांसाठी मार्गदर्शक आहे.
जीवन ‘सुखी’ करण्याच्या प्रयत्नात जीवन ‘आनंदी’ बनवण्याच्या संधीचा आपण त्याग करतो याचं भगवंताला व संतसद्गुरुंना वाईट वाटते. हीच व्यथावेदना ते ‘बुडते हे जन देखवे ना डोळां’ या शब्दात व्यक्त करतात. संतांना मानव आनंदाचा जन्मसिद्ध अधिकार सहज उपलब्ध असूनही मिळवत याबद्दल खेदखंत याचा अनुभव येतो. पण भगवंत मात्र या सार्‍या प्रकारातले ना खेद ना खंत या तटस्थ, साक्षी भावनेनं पाहतात. ते समुपदेशन मात्र करत राहतात.
भगवंतांच्या उपासनेतून सुख मिळवण्याच्या मानवाच्या प्रयत्नांच्या संदर्भात ते म्हणतात-
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितु मिच्छति|
तस्य तस्य अचलां श्रद्धां ताम् एव विदधाम्यहम् ॥
(७/२१)
म्हणजे जो जो भक्त (सकाम भावनेनं) ज्या ज्या देवतेच्या रुपाला, मूर्तीला (यां यां तनुम्) श्रद्धेनं पुजण्याची इच्छा करतो (श्रद्धया अर्चितुम् इच्छति) त्या त्या भक्ताची (तस्य तस्य) मी त्याच देवतेच्या ठिकाणी (ताम् एव) श्रद्धा स्थिर करतो (श्रद्धां अचलां विदधामि|)
आपल्या ऋषीमुनींनी त्यांच्या अद्वितीय प्रतिभेतून, कल्पनाशक्तीतून तेहत्तीस कोटी देवांची संकल्पना आपल्यासमोर मांडली. आपण ज्याला परमेश्‍वर म्हणतो नि मानतो त्या दिव्य शक्तीची व चैतन्याची कल्पना वर्णन करताना त्यांनी त्या परमशक्तीचे तेहत्तीस कोटी पैलू आपल्याला सांगितले. आपण दुर्दैवानं पण सोयिस्करपणे त्या पैलूंची ‘संख्या’ मानायला सुरवात केली. तेहत्तीस कोटी (संख्या) देव आपल्याला पूजाअर्चना कि भक्ती, उपासना करण्यासाठी उपलब्ध झाले. जोपर्यंत या तेहत्तीस कोटी देवांच्या आरंभी व अंती एकच परमतत्त्व आहे याची जाणीव ठेवून विविध देवदेवतांची उपासना केली जाते तोपर्यंत काहीही बिघडत नाही. असंख्य ठिणग्या मोजता येतील अशा प्रकारे अवकाशात उडालेल्या दिसल्या त्यांच्या तेजानं डोळे दिपून गेले, मन प्रभावित झाले तरी या सार्‍या ठिणग्यांचे (स्फुल्लिंगांचे) मूळ एकच अग्नी आहे हा भाव मनबुद्धीत दृढ असायला हवा. नाहीतर विविध देवदेवता, त्यांचे भिन्न पंथ-संप्रदाय, प्रत्येकाचा स्वतंत्र ग्रंथ-स्तोत्र-तीर्थक्षेत्र-उपवासाचा वार-उपासनेची तिथी (जशी देवीची पंचमी; गणेशाची चतुर्थी; पांडुरंगाची एकादशी इ.) यामुळे काळाच्या ओघात ही विविधता वरदान न राहता शाप बनत गेली. संकुचित अस्मितेमुळे; अभिमानामुळे अहंकार जोपासला जाऊन आपल्या देवाचं – पंथाचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी रक्तपात होऊ लागला. फार मोठी किंमत महान् ऋषीमुनींच्या खुज्या (लहान) अनुयायांनी आपल्याला, देशाला, समाजाला, संस्कृतीला, खर्‍या सत्‌धर्माला आजपर्यंत चुकवावी लागलीय. अजूनही आपण स्वतःची फसवणूक (आत्मवंचना) करत आहोतच. विविधतेला विरोध असण्याचं कारणच नाही. कारण भिन्नता, विविधता, अनेकता (डायव्हर्सिटी, व्हरायटी) हा निसर्गसृष्टीचा प्राण आहे. पण निसर्गात या विविधतेच्या मुळाशी एकता, एकात्मता (युनिटी, इंटेग्रिटी) आहे. विषमता वा भेदभाव नाहीये. मुळातील एक तत्त्व लक्षात घेतलं (एकं सत्) तर प्रतिभावंत अधिकारी व्यक्तींनी ते अनेक प्रकारे वर्णन वा व्यक्त केलं (विप्रा बहुधा वदन्ति) हे समजता येतं. परंतु वरवर, पृष्ठभागावर दिसणार्‍या विविधतेच्या मुळात एकात्मता, अनेकतेंत एकता दिसल्याशिवाय यातून कल्याण (जगाचं अन् माझं स्वतःचं) शक्य नाही. विविधतेच्या मोहात, लोभात, प्रेमात पडणं हा देहाचा, प्रपंचाचा धर्म आहे. पण एकतेच्या, अद्वैताच्या विस्मरणात देवाला, परमेश्‍वराला, विश्‍वधर्माला न पुजता (न मानता) देहसुखाच्या धुंदीत, प्रपंचात मनासारख्या गोष्टी घडाव्यात, मिळाव्यात म्हणून या.. त्या.. देवाला भजत राहतो, सकाम भक्ती करत राहतो आणि आशा-निराशा, सुख-दुःख यांच्या हिंदोळ्यावर झुलत राहतो. झोपाळा जसा कधी खाली, कधी वर असा आंदोलनं घेत राहतो तसे आपण कधी सुखात ‘उडतो’ तर दुःखात ‘बुडतो’. रामकृष्ण परमहंस या भ्रमाला, आसक्तीला दोन शब्द वापरतात. ‘कामिनी-कांचन’ म्हणजे वासना (भोग) व लालसा (लोभ). भगवंत पुढे सांगतात ते समुपदेशनाच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचं आहे –
स तया श्रद्धया युक्तः तस्य आराधनमीहते |
लभते च ततः कामान् मयैव विहितान् हि तान् |.
(७/२२)
याचा अर्थ महत्त्वाचा आहे. – जो जो ज्या ज्या देवाची श्रद्धेनं पूजा (भक्ती) करतो.. तो तो त्या श्रद्धेनं युक्त होऊन त्या देवतेचं (आर्ततेनं, उत्कटतेनं) पूजन करू लागतो अन् त्या त्या देवतेपासून माझ्याकडूनच दिल्या गेलेल्या (पुर्‍या केल्या गेलेल्या) त्या सकाम (इच्छित) भोगांना निश्चित प्राप्त होत असतो (मया एव विहितान् तान् कामान् हि लभते!) याचा अर्थ स्पष्ट आहे. कितीही वेगवेगळ्या देवांची वेगवेगळ्या इच्छापूर्तीसाठी उपासना केली. (उदा.- बुद्धीसाठी सरस्वतीची; श्रीमंती-समृद्धीसाठी लक्ष्मीची; शक्तीसाठी मारुतीची) तरी तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी ते ते देवदेवता माझ्याकडून मागून घेऊन (प्राप्त करून) तुम्हाला देतात. भगवंताला असं सुचवायचंय की तुम्ही काहीही मागितलं; कोणतीही व्रतंवैकल्य किंवा कितीही उपासतापास किंवा विविध नवससायास केले तरी ते देव, त्या देवता किंवा ती दैवतं तुम्हाला स्वतः काही देऊ शकत नाहीत. तर तुमच्या प्रारब्धाची चौकट व माझी इच्छा यांच्या मर्यादेतच तुम्हाला भोग-उपभोग मिळत राहतात. इतकं करून त्या सार्‍या सकाम भक्तीतून, विविध देवांच्या उपासनेतून मिळवलेल्या गोष्टी सदैव तुमच्या कल्याणाच्याच असतील असं नाही.
* नवस सायासांनी मिळालेला मुलगा पुढे असं वागतो – असे व्यवहार करतो की तो सज्ञान झाल्यावर (१८ व्या वर्षी) कायदेशीर नोटिस देऊन आपल्यावर जाहीरपणे सांगण्याची पाळी येते की त्याने केलेल्या कोणत्याही व्यवहाराशी आमचा काहीही संबंध नाही.
* नोकरीत बढती मिळण्यासाठी केलेल्या विविध पूजाअर्चांमुळे बढती मिळाली तरी अत्यंत गैरसोयींच्या ठिकाणी, (काळ्या पाण्याची शिक्षा दिल्याप्रमाणे) बदली झाली तर बढती नकोशी होते.
* अत्यंत गुणी मुलगा, सुंदर मुलगी लाभल्यावर स्वर्ग लाभल्याचा होणारा आनंद कायम टिकणारा नसतो. आजचा गुणी मुलगा उद्या वाईट संगत, व्यसनं यामुळे स्वतःचा व कुटुंबाचा विनाश ओढवून घेतो. तर अत्यंत सुंदर असलेल्या मुलीवर अत्याचार, बलात्कार होऊ शकतो. अगदी ऍसिड हल्ल्यामुळे, तेजाब फेकल्यामुळे ती कायमची विद्रुप होऊन जाते. तिला व आपल्याला जीवन असह्य होऊन जातं. या घटना पूर्वी जेवढ्या अपवादात्मक होत्या तेवढ्या आता अपवादात्मक राहिलेल्या नाहीत.
मुद्दा एवढाच की अत्यंत क्षणभंगूर, सदैव बदलणारे असे देहाचे उपभोग, मनोकामना मिळवण्यासाठी केलेल्या सकाम भक्तीपेक्षा अंतरंगीची निष्काम भावाकडे नेणारी सूक्ष्म उपासना अधिक प्रभावी आहे हे भगवंत सोप्या पण स्पष्ट शब्दात सांगताहेत-
अंतवत् तु फलं तेषां तत् भवति अल्पमेधसाम् |
देवान् देवयज्ञः यान्ति मद्भक्ता यांति मामपि॥
(७/२३)
म्हणजे ‘अंतवत् फलम्’ नाश होणारं, संपणारं, बदलणारं फळ मिळवणारे अल्पबुद्धी, मूढ लोक (अल्पमेधसाम्) निरनिराळ्या देवदेवतांची पूजा करून (देवयज्ञः) त्या त्या देवांना (भोगांना) प्राप्त होतात (देवान् यान्ति) पण माझे भक्त (परमेश्‍वराचे अमूर्ताची – अव्यक्ताची पूजा करणारे लोक) मलाच प्राप्त होतात (मद्भक्ताः माम् अपि यान्ति) म्हणजे ते मुक्त होतात. जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका करून घेतात. त्यांना पुनर्जन्म नसतो. ते माझ्याशी एकरूप, एकात्म होऊन जातात.
परमेश्‍वराच्या अशा अमूर्त स्वरुपाची अंतरंगीची भक्ती करताना बाहेरच्या विविध देवांच्या मूर्तींची सकाम पूजा बंद करण्याची गरज नाही. या संदर्भात संतांचं मार्गदर्शक रोखठोक आहे. ज्ञानोबा म्हणतात ‘तुज सगुण म्हणू की निर्गुण रे| सगुणनिर्गुण दोनु गोविंदु रे|’ जिवंत कृष्ण अर्जुनाला हवा होता, तसाच लक्ष्मणालाही जिवंत, मूर्त श्रीराम हवा होता. त्याचवेळी उद्धवाला मूर्त कृष्णाचं मूर्त रुप तसंच अमूर्त स्वरूप असलेला भागवत ग्रंथ पुरला तर भरताला रामाच्या पादुका या मूर्त रामाचं मूर्त-अमूर्त प्रतीक म्हणून चालल्या. हे सारे भक्तच देवाचे (देहातील व्यक्त किंवा अमूर्त रामाचे नि कृष्णाचे) पण त्यातही भरत-उद्धव हे परमेश्‍वराचे (देहातीत अव्यक्त किंवा अमूर्त रामाचे नि कृष्णाचे) भक्त श्रेष्ठ फळ म्हणजे प्रत्यक्ष भगवंतालाच मिळवतात- तो देहात असताना (मूर्त रुपात) तसेच देह ठेवल्यानंतरही (अमूर्त स्वरूपात). रूप हे क्षणिक असतं, क्षणाक्षणाला बदलत असतं, क्षणोक्षणी भग्न पावत असतं.
हे विचार समजायला अवघड वाटले तरी निश्चय-निर्धार केला तर जगायला तेवढे अवघड नाहीत. नव्हे तसंच जीवन जगलं पाहिजे प्रत्येक माणसानं हा भगवंतांचा आग्रह व अपेक्षा आहे.
गीतेत भगवंत कशाचाही निषेध करत नाहीत. ते सर्व विचारधारांचं स्वागत करतात. सर्व विचारप्रवाहांचा संगम साधतात. सर्व ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गांचा समन्वय, संवाद घडवतात. जीवनाला स्पर्श करणार्‍या सर्व विचार – भावना – कल्पना -घटना या सार्‍यांचा सुमधुर योग साधतात. म्हणून गीतेच्या शेवटी संजय श्रीकृष्णभगवानांचं वर्णन ‘योगेश्‍वर’ या शब्दात करतो. अन् एक सर्व काळासाठी योग्य असा विश्‍वसिद्धांत सांगतो की – वैभव, समृद्धी, यश, सुख, नीति इ. गोष्टी हव्या असतील तर नुसता बाळकृष्ण वा बासरीधारी कृष्ण नको, नुसता गोपाळ वा गोपीकृष्ण नको; नुसता कालियामर्दन वा गोवर्धन उत्थान करणारा कृष्ण नको… या सार्‍या कृष्णरुपांच्या मूर्तींची मंदिर उभारुया. उत्सव करुया. पण सार्‍या योगांचाही योग साधणार्‍या योगेश्‍वर भगवानाचं मानसपूजन-ध्यान-नाम-अनुसंधानही करत राहू याचं.
………………………………………