येडीयुराप्पाच हवेत

0
93

भाजप आमदार, खासदारांचा आग्रह

भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या आदेशानंतर बी. एस. येडीयुराप्पा यांनी मुख्यमंंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शविली. मात्र काल बेंगलोर येथे नवीन नेत्याच्या निवडीसाठी झालेल्या भाजपच्या प्रदेश व केंद्रीय नेत्यांच्या संयुक्त बैठकीत येडीयुराप्पा हेच मुख्यमंत्रीपदी हवेत असा आग्रह त्यांच्या समर्थक आमदार व खासदारांनी धरला. त्यामुळे भाजपसमोर नवीन पेच निर्माण होऊन बैठकच आवरती घ्यावी लागली.

७५ आमदार, १५ खासदार आणि २० विधानपरिषद सदस्यांचा येडीयुराप्पा यांनाच पाठिंबा असल्याचा दावा, भाजपचे राज्यसभा खासदार प्रभाकर कोरे यांनी केला. काही आमदारांनी मागणी केली की येडीयुराप्पा यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्यात यावे व त्यांच्याकडेच मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार द्यावेत.

भाजपने बेंगलोर येथे पाठवलेल्या राजनाथ सिंह आणि अरुण जेटली या दोन निरीक्षकांकडे येडीयुराप्पा समर्थक आदारांनी मागणी केली की त्यांना राजीनामा देण्यास सांगण्याच्या निर्णयाचा पक्षाने फेरविचार करावा. त्यांच्या पदावर राहण्याविषयी प्रत्येक आमदाराचे मत जाणून घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, दुसरा मुख्यमंत्री झालाच तर तो आपल्या मर्जीतील असावा यासाठी येडीयुराप्पांनी तयारी चालविल्याचेही वृत्त आहे. परवा केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्यानुसार राजीनामा देण्याची तयारी दर्शवून अधिकृतरित्या उद्या रविवारी राज्यपाल भारद्वाज यांना राजीनामा सादर करेन असे म्हटले होते.