वैदिक – सईद भेटीचा वादंग

0
157

– गंगाराम म्हांबरे
जग छोटे बनले आहे, सर्व देश एकमेकांजवळ आले आहेत असे म्हटले जाते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे सारे शक्य झाले आहे. सहजपणे कोणीही कुठेही जाऊ शकतो. कोणाशीही सहजपणे बोलू शकतो, हे जरी खरे असले तरी एखादा देशवासीय शत्रूदेशात जाऊन अतिरेकी टोळक्याच्या म्होरक्याशी बोलला, तर त्याचे समर्थन केले जाऊ शकते काय? यापूर्वी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी घनदाट रानांत, डोंगरदर्‍यांमध्ये दहशत माजवणार्‍या, लुटमार करणार्‍या डाकूंशी चर्चा केली होती, नंतर चंदनतस्कर विरप्पन याच्याशीही संवाद साधण्याचा प्रयत्न झाला होता. अशा प्रयत्नांना यश कितपत आले हा प्रश्‍न नगण्य आहे, मात्र त्यामागचा हेतू स्पष्ट होता, सरळ होता. कडवा अतिरेकी हाफिझ सईद आणि पत्रकार वेदप्रताप वैदिक यांच्यामधील बैठक आणि मुलाखत यासंबंधी सध्या जो वादंग माजले आहे, त्यामागचे कारण केवळ वैदिक यांच्या हेतूबद्दल संशय हेच आहे. वैदिक केवळ पत्रकार या नात्यानेच सईदला भेटले का? सईद हा संयुक्त राष्ट्रे, अमेरिका आणि भारतालाही ताब्यात हवा आहे. त्याच्या अतिरेकी कारवाया जगात परिचित आहेत, मुंबईच्या २६/११ हल्ला प्रकरणातील तो प्रमुख आरोपी आहे, जम्मू-काश्मीरमध्ये दहशत माजवणार्‍या, त्या राज्यात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी घुसखोरांमार्फत चिथावणी देण्याचा सतत प्रयत्न करणार्‍या आयएसआय संघटनेच्या खास देखरेखीखाली आणि सुरक्षेखाली असलेला सईद भारतीय पत्रकाराला सहजपणे भेटतो, यामागच्या कारणांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वैदिक म्हणतात की, ते कोणाच्या वतीने सईदला भेटले नाहीत. प्रत्यक्षात योगगुरू रामदेवबाबा यांचे निकटवर्ती आणि विद्यमान रालोआ सरकारचे खंदे समर्थक अशी वैदिक यांची प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीकडे, बैठकीकडे संशयाने पाहिले गेले. त्यांनी सरकारी दूताच्या नात्याने सईदची भेट घेतली असावी, असाही संशय विरोधी राजकीय पक्ष आणि वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केला. अर्थात यात तथ्य नाही, हे नंतर उघड झाले. सरकारने आपली भूमिका संसदेत मांडताना इस्लामाबादमधील भारतीय दूतावासालाही या भेटीची कल्पना नव्हती असे स्पष्टीकरण दिले आहे. असे असेल तर वैदिक यांची भेट कोणी व का घडवून आणली, हा प्रश्‍न अनुत्तरित राहातो. पत्रकार स्वतःच्या हिमतीवर व कुवतीवर कुणालाही, चक्क सैतानालाही भेटू शकतो असे म्हटले जाते, मग वैदिक यांच्या भेटीलाचा आक्षेप का घेतला जात आहे, याच्या मुळाशी जावे लागेल.
वैदिक पाकिस्तानला का गेले होते, याबद्दलची माहिती उघड झाली आहे, जी अधिक धक्कादायक आहे. ‘रीजनल पीस इनिशिएटीव्ह’ या नावाने आयोजित परिषदेसाठी भारतातून जे शिष्टमंडळ गेले होते, त्यात वैदिक यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व माजी केंद्रीय मंत्री मणीशंकर अय्यर यांनी केले होते, त्यात माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांचा समावेश होता. एवढेच नव्हे तर स्वपन दासगुप्ता हे भाजपसमर्थक पत्रकारही होते. ज्या संस्थेने ही परिषद आयोजित केली होती, त्यावर पदाधिकारी म्हणून काम करणारे किमान दोघेजण आयएसआयचे उच्चाधिकारी होते, अशीही माहिती समोर आली आहे. अशा संस्थेच्या परिषदेत भारतीयांनी का सहभागी व्हावे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. भारतीय सदस्यांच्या मते ही संस्था शांततेसाठी झटणारी संस्था आहे. याबद्दल शंका उपस्थित न करता असे म्हणता येईल की या सदस्यांचा पाकिस्तानचा दौरा चांगल्या उद्देशाने होता, मग वैदिक त्या परिषदेनंतर मागे का राहिले? वैदिक यांच्या मते त्यांचे अनेक जागतिक नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. या भेटीच्यावेळी ते पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही भेटले. ते काहीही असो, वैदिक यांनी सईद यांची घेतलेली भेट वादग्रस्त ठरली आहे. पत्रकार म्हणून चाळीस वर्षांत त्यांना जेवढी प्रसिद्धी आणि मानमरातब लाभला नव्हता, तेवढा वृत्तवाहिन्यांनी मागच्या आठवड्यात दिला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी वैदिक यांच्या भेटीची दखल घेताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध जोडणे अपेक्षित होतेच. अर्थात वैदिक यांचे संबंध अनेक नेते व काही संस्थांशी आहेत, याबद्दल वाद नाहीच, तर त्यांनी सईद यांची घेतलेली भेट व त्यासंबंधात केलेली निवेदने लक्षवेधी ठरली आहेत. आपण केवळ धर्मादाय कार्य करतो, दहशतवादाशी आपला संबंध नाही, असे जे सईद यांनी म्हटले, ते आपण मान्य केले नाही. उलट पाकिस्तानी न्यायालयांनी तुम्हाला निर्दोष ठरवले, तरी त्यावरचे न्यायालय (अल्ला, ईश्‍वर) तुम्हाला सजा देईलच, कुराणातील उपदेशाप्रमाणे मुस्लिमांनी हिंसा सोडावी, असे आपण त्यांना म्हटल्याचे वैदिक यांनी सांगितले आहे. अर्थात काश्मीरला स्वायत्तता द्यावी किंवा तो स्वतंत्र देश बनावा असे म्हणणे म्हणजे सईदला त्या ठिकाणी आपल्या कारवाया वाढविण्यास मदत करण्यासारखे आहे. असे वैदिक खरेच म्हणाले का, हा प्रश्‍न आहे. वैदिक यांच्यासारखा परिपक्व आणि ‘सिझन्ड’ पत्रकार असे काही बरळेल असे वाटत नाही. त्यामुळे एखाद्या पत्रकाराच्या अशा भेटीबद्दल एवढा आकांडतांडव करणे ना विरोधी पक्षांना शोभते, ना वृत्तवाहिन्यांची टीआरपी वाढवते. संसदेचा वेळ वाया घालवण्यात तर विरोधकांची वैचारिक दिवाळखोरीच अधिक दिसते. वैदिक यांची पार्श्‍वभूमी लक्षात घेता, ते कोणतीही देशद्रोही कृती अथवा वक्तव्य करण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे एकंदरित वादंग हे चहाच्या पेल्यातील वादळ ठरेल अशी चिन्हे दिसतात. सईद यांचा पाहुणचार झोडलेल्या वैदिक यांच्याकडून त्यांचा एकंदरित दृष्टीकोन समजून घेणे चौकशी यंत्रणांना योग्य ठरेल. जगात हिंसा आणि दहशतवाद पसरवणार्‍या लष्करे तोयबा आणि जमात उल दावा अशा संघटना चालविणार्‍या सईदला वठणीवर आणण्याच्या कामाला आता तरी चालना मिळावी, अशीच अपेक्षा शांतताप्रिय नागरिक करतील. वैदिक भेटीने भारतात निर्माण झालेले वादळ त्या देशातील (भारत)राजकीय नेत्यांची असहिष्णुता दाखवते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून सईद याने जखमेवर मीठ चोळले आहे. त्याला कृतीने उत्तर कसे द्यायचे यावर अधिक विचार व्हायला हवा.