केशरापासून क्रिकेटपर्यंत…

0
91

(चिनारच्या छायेत-४)

– परेश वा. प्रभू 

श्रीनगर – जम्मू राष्ट्रीय महामार्ग क्र. १ ने जम्मूच्या दिशेने निघाले की श्रीनगर ओलांडल्यावर सुमारे १५ कि. मी.वर  पहिले महत्त्वाचे गाव लागते ते पाम्पौर. प्राचीन काळी ‘पद्मपूर’ या नावाने ओळखले जाणारे हे गाव केशराच्या शेतीसाठी जगभरात विख्यात आहे. काश्मीर खोर्‍यात फक्त येथे उच्च प्रतीचे केशर मिळते. जम्मूमधल्या किश्तवारमध्येही केशराची शेती काही प्रमाणात होते, परंतु पाम्पौरचे केशर जगभरात प्रसिद्ध आहे. 
केशर म्हणजे खरे तर एका विशिष्ट प्रकारच्या फुलांतले पराग. जांभळ्या रंगाची ही फुले ‘सॅफ्रन क्रॉकस’ म्हणून ओळखली जातात आणि जमिनीच्या अगदी लगत ती उमलतात. ऑक्टोबरच्या मध्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जेमतेम तीन आठवडेच केशराची ही फुले उमलतात. बाकी वर्षभर पाम्पौरची माळराने उजाड असतात, पण केशराच्या हंगामात हे सगळे पठार जांभळ्या रंगाची दुलई घेऊन पहुडल्यासारखे वाटते असे आमचा चालक मुश्ताकने सांगितले. आम्ही उन्हाळ्यात गेल्याने अर्थातच ते भाग्य आम्हाला लाभले नाही, पण अस्सल केशराच्या खरेदीचा आनंद मात्र मिळाला. 

जहॉंगीर बादशहा म्हणे केशराच्या शेतात चांदण्या रात्री हिंडायचा. शेकडो वर्षांपासून पाम्पौरमध्ये केशर पिकवले जाते. येथे केशर कसे आले त्याची कहाणीही रंजक आहे. ख्वाजा मसूद वाली आणि शेख शरिफुद्दिन वाली हे दोन सुफी संत भारतात पाम्पौरला आले असता म्हणे आजारी पडले. त्यांच्यावर स्थानिकांनी औषधोपचार केले. त्याची परतफेड म्हणून त्यांनी आपल्याजवळची केशराची फुले दिली. तेव्हापासून केशर हे पाम्पौरची ओळख बनले आहे. येथील केशराची सर्वोत्तम जात ‘शाही जाफरान’ म्हणून ओळखली जाते. जेव्हा एक लाख सत्तर हजार फुलांतले पराग खुडले जातात, तेव्हा कोठे एक किलो केशर बनते यावरून त्याचे मोल लक्षात यावे. आजही अत्यंत महागडे असलेले हे केशर पारखण्याचेही खास तंत्र आहे. पाम्पौरमधील विक्रेते खरे केशर आणि बनावट केशर ओळखण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतात. 
प्राचीन अवंतीपुरा नगरी
पाम्पौरपासून अनंतनागच्या दिशेने निघाले की दुसरे महत्त्वाचे ठाणे लागते ते म्हणजे प्राचीन नगरी अवंतीपुरा. श्रीनगरपासून २८ कि. मी. वर आजच्या पुलवामा जिल्ह्यात हे गाव येते. एकेकाळी राजा अवंतीवर्मनची राजधानी असलेल्या या गावात अत्यंत प्राचीन भव्य मंदिरांचे भग्नावशेष गतकाळाची कहाणी सांगत येथे उभे आहेत. राजा अवंतीवर्मन इ. स. ८५३ ते ८८३ या दरम्यान येथे राज्य करीत होता. तो काळ काश्मीरचा सुवर्णकाळ होता असे मानले जाते. त्याचा पुत्र शंकरवर्मन हाही पराक्रमी राजा होता. अवंतीवर्मनने येथे दोन मंदिरे उभारली. एक शिवाचे आणि दुसरे विष्णूचे. खरे तर तो स्वतः शैव उपासक होता. शैव आणि वैष्णव यांच्यातील वाद शतकानुशतके चालत आला आहे. परंतु शिव आणि विष्णूच्या उपासकांमध्ये समन्वय घडवून आणण्याच्या उदात्त उद्दिष्टातून ही दोन भव्य मंदिरे अवंतीवर्मनने येथे उभारली होती. दोन्ही मंदिरांमध्ये एक कि. मी. चे अंतर आहे. यापैकी शिवमंदिर पाहायला वेळ मिळाला नाही, परंतु विष्णूमंदिर मात्र निवांत पाहता आले. 
श्रीविष्णूचे भव्य मंदिर एका उंच चौथर्‍यावर उभारण्यात आले होते, तो चौथरा आणि त्याचे भग्न कोरीव खांब आजही काळाशी झुंज देत उभे आहेत. या मंदिराच्या आवारात ६९ छोटी मंदिरे होती आणि एका तलावाच्या मधोमध मुख्य मंदिर उभे केले गेले होते. आज तलाव राहिलेला नाही आणि मंदिरही.
ही मंदिरे परकीय आक्रमकांनी भग्न केली की नैसर्गिक आपत्तीमुळे भग्न झाली याचे उत्तर मात्र आपल्याला मिळत नाही. मंदिराचे भव्य प्राकार, महाकाय स्तंभ, त्यावरील प्राचीन शिल्पकृती आपल्याला या मंदिरांच्या भव्यतेची कल्पना मात्र देतात.
क्रिकेट बॅटनिर्मिती
श्रीनगर – अनंतनाग या प्रवासात लक्ष वेधून घेणार्‍या आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावाच लागेल, ती म्हणजे येथील क्रिकेट बॅटनिर्मितीचे अनेक लघुउद्योग. क्रिकेट बॅट ज्या वाळुंजीच्या लाकडापासून बनते (ज्याला विलो ट्री म्हणतात) त्याची शेकडो झाडे या परिसरात आहेत. ब्रिटिशांच्या काळात ही झाडे येथे लावली गेली. ही झाडे कापून त्यांचे ओंडके चिरून साधारणतः क्रिकेट बॅटचा आकार देऊन जवळजवळ सहा महिने ते लाकूड वाळवले जाते. त्यासाठी वीटभट्टीत विटा एकावर एक ठेवतात, तशी ही कापलेली लाकडे एकावर एक रचून सहा महिने वाळवली जातात. अनंतनागकडे जाताना महामार्गाच्या दुतर्फा ही बॅटच्या आकाराची लाकडे होमकुंड रचावे तशी रचलेली दिसतात. जागोजागी क्रिकेट बॅट विक्री करणारी दुकाने आहेत हे तर सांगायला नकोच. येथील सुप्रसिद्ध अल्फा क्रिकेट बॅट फॅक्टरीला आम्ही भेट दिली तेव्हा क्रिकेटची बॅट प्रत्यक्षात कशी बनते त्याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. 
वाळुंजीचे लाकूड पाण्यात भिजवून प्रचंड दाबाखालून सरकवले जाते. खालच्या साच्यामुळे त्याला हवा तो आकार काही क्षणांत प्राप्त होतो. त्यानंतर त्याच्यावर ऑईलिंग, पॉलिशिंगची प्रक्रिया होत असते. 
या बॅटसाठी लागणारे हँडल मात्र येथे बनत नाही. ते आयात केले जाते. क्रिकेट बॅटच्या हँडलच्या लाकडात विशिष्ट प्रकारे रबर मिसळलेला असतो. ती विदेशांतून आयात करून विलो ट्रीपासून बनलेल्या बॅटला जोडली जातात. त्यावर पुढची प्रक्रिया केली की झाली बॅट तयार! पण विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर येथे क्रिकेट बॅटी बनत असल्या तरी त्यांच्या विक्रीसाठी मात्र त्यांना बड्या मार्केटिंग कंपन्यांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे बॅटी येथे बनत असल्या तरी मोठमोठ्या ब्रँडस्‌च्या नावे त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकल्या जातात. टेनिस बॉल, सीझन बॉलची बॅट वेगवेगळी कशी असते, अलीकडेच आलेली मुंगूस बॅट कशी बनते हे सगळे येथे तपशिलाने पाहायला मिळते. शोभेच्या छोट्या बॅटीही येथे खरिदता येतात. गावस्करपासून तेंडुलकरपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी येथे बनलेल्या बॅटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरल्या आहेत. मात्र, आज जागतिक स्पर्धेच्या युगामध्ये हा कुटिरोद्योग दिशाहीन बनत चाललेला आहे. काश्मिरी जनतेचे भले करायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खरोखर मनात असेल तर काश्मीरच्या वर्षाला पाच लाख बॅट बनवणार्‍या या उद्योगाला त्यांनी नवी दिशा द्यायला हवी.
मार्तंडचे सूर्यमंदिर आणि मत्स्यमंदिर
दहशतवादी कारवायांमुळे आज कुख्यात झालेल्या अनंतनागहून आम्ही राष्ट्रीय महामार्ग सोडून डावीकडे पहलगामच्या रस्त्याला लागलो. मार्तंड, ऐश मुकाममार्गे हा नितांतसुंदर रस्ता पहलगामला जातो. मार्तंड हे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. काश्मिरी पंडितांमध्ये त्याला विशेष स्थान आहे. या क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मासे हे देवस्वरूप मानले जातात. विमलकुंड आणि कमलकुंड या दोन कुंडामध्ये हजारोंच्या संख्येने मासे आहेत. भाविक तेथे चणे चुरमुरे घेऊन या माशांना खायला घालतात.
या मंदिराची कथा रोचक आहे, जी तेथील पुजार्‍याकडून ऐकायला मिळाली. कश्यप ऋषींची पत्नी अदिती हिला बारा मुले झाली. ती जन्मताना अंड्याच्या स्वरूपांत होती. तेराव्या बालकाच्या जन्माच्या वेळी कश्यप आणि अदिती यांच्यात वाद झाला आणि रागाने माता अदितीने आपले तेरावे अंडे सतीसार सरोवरात फेकून दिले. पुढे त्या सरोवरातील जलोद्भव राक्षस लोकांना त्रास देऊ लागला तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेशाची आराधना करून कश्यप ऋषींनी त्या सरोवराचे पाणी आटवले, तेव्हा आत आपला तेरावा पुत्र त्यांना आढळला. मात्र त्याने कश्यप ऋषींना जुमानले नाही. तेव्हा कश्यप ऋषींनी पुन्हा परमेश्वराचा धावा केला. भगवान श्रीविष्णूंनी सुदर्शन चक्र सोडून त्या अंड्याचे दोन तुकडे केले, तेव्हा दोन कुंडे तयार झाली. एक विमल कुंड आणि दुसरे कमल कुंड असे मानले जाते. अंड्यातून बाहेर आलेल्या ज्वाळेतून भार्गशिखा, भीमादेवी, बसवती व श्रीभवानी ही चार शक्तीपीठे निर्माण झाली. माघ शुक्ल सप्तमीला मट्टणमध्ये मोठा उत्सव होतो. विशेष उल्लेखनीय म्हणजे श्रीअमरनाथाची यात्रा करणार्‍या भाविकांनी मट्टणला भेट देऊन येथील मत्स्यस्वरूप ईश्वराला वंदन केल्याखेरीज ती यात्रा पूर्ण होत नाही असे मानले जाते.
काश्मीरमधील नामशेष होत गेलेल्या हिंदू संस्कृतीचे उरलेसुरले अवशेष पाहत सुन्न मनाने आपण पहलगामच्या रस्त्याला लागतो. वाटेत गणेशपुरासारख्या गावी काश्मिरी पंडितांची मोठमोठी बहुमजली उजाड, पडकी घरे लागतात. काश्मिरच्या दुर्दैवाची कहाणी सांगून जातात…