वैयक्तिक गरजा भागविणार्‍या कर्ज योजना

0
210

– शशांक मो. गुळगुळे 

सहकारी बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, परदेशी बँका तसेच काही सार्वजनिक उद्योगातील बँकाही वैयक्तिक कर्जे देतात. ही कर्जे असुरक्षित मानली जातात. त्यामुळे इतर सर्व कर्जांपेक्षा या कर्जांवर जास्त दराने व्याज आकारले जाते. ‘कोलॅटरल सिक्युरिटी’ देऊन घेतलेल्या कर्जांचे व्याजाचे प्रमाण कमी असते. वैयक्तिक कर्ज प्रकारात ‘कोलॅटरल सिक्युरिटी’ घेतली जात नसल्यामुळे कर्जाचा व्याजदर जास्त असतो. सध्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर किमान १४ टक्के इतका आहे.

वित्तीय संस्थादेखील ही असुरक्षित वैयक्तिक कर्जे देतात. सार्वजनिक उद्योगातील काही बँका मात्र ‘गॅरेंटर’ दिल्याशिवाय ही कर्जे संमत करीत नाहीत. ही कर्जे वैयक्तिक कारणांसाठी घेतली जातात. ती कारणे म्हणजे- लग्नाचा खर्च भागविणे किंवा पर्यटनासाठी जाणे, फ्रिज, एसी, महागाईचा दूरचित्रवाणी संच वगैरेची खरेदी, वैद्यकीय कारणांसाठी तसेच गृहकर्जात अर्जदाराला जी रक्कम भरावी लागते ती भरण्यासाठी अशा प्रकारच्या कारणांसाठी वैयक्तिक कर्जे घेतली जातात. हे कर्ज घेण्यासाठी इतर कर्जांसारखे बरेच ‘डॉक्युमेन्ट’ द्यावे लागत नाही. किमान ‘डॉक्युमेन्ट’ दिल्यानंतर हे कर्ज संमत होऊ शकते. हे कर्ज संमत होण्यासाठी इतर कर्जांसारखा जास्त कालावधी लागत नाही. फार कमी कालावधीत ही कर्जे संमत होतात. परिणामी कर्जदारांना हा कर्जाचा पर्याय जास्त आवडतो. कर्जदाराला वैयक्तिक कर्ज किती संमत करायचे व व्याजदर काय ठरवायचा हे प्रामुख्याने तीन गोष्टींवरून ठरते. यापैकी पहिली गोष्ट म्हणजे कर्जदाराचे उत्पन्न. दुसरी बाब म्हणजे कर्जदाराची कर्ज फेडण्याची क्षमता व तिसरी बाब म्हणजे कर्जदाराचा आर्थिक व्यवहारांचा इतिहास तसेच जर कर्जदाराच्या कंपनीचे नाव मोठे नसेल तर जास्त व्याजदर आकारला जाण्याची शक्यता असते. वैयक्तिक कर्जांवर किमान १४ टक्क्यांपासून कमाल ४८ टक्क्यांपर्यंत कर्जदाराचे कंबरडे मोडणारे व्याज आकारले जाते. ‘सिटी’ वगैरेसारख्या परदेशी बँका स्वतःहून फोन करून कोणालाही ‘तुम्हाला वैयक्तिक कर्ज हवे आहे काय?’ अशी विचारणा करतात. या फोन करण्यातून एखादा जरी मासा गळाला लागला तरी त्या बँकेला चांगले उत्पन्न मिळू शकते.
जर कर्जाची गरज कमी कालावधीची असेल तर चढ्या व्याजदराने वैयक्तिक कर्ज घेण्यापेक्षा इतर कमी व्याजदराचे पर्याय उपलब्ध आहेत. ते म्हणजे, कुटुंबातील सदस्याकडून किंवा मित्रांकडून किंवा नातलगांकडून कर्ज घ्यावे. हा सर्वात चांगला पर्याय आहे. कारण या कर्जाच्या नियम व अटी कोणत्याही वित्तीय संस्थेच्या नियम व अटींपेक्षा जास्त सुसह्य असणारच. समजा कर्जदाराच्या हातात जास्त निधी आला तर तो पटकन कर्ज फेडू शकतो. नातलग, मित्र किंवा नातेवाईकांकडे कर्ज मागण्यात काहीही कमीपणा नाही. कित्येक कंपन्याही यामार्गे निधी उभा करतात.
मुदत ठेवींवर कर्ज ः समजा एखाद्याची बँकांच्या मुदत ठेवीत गुंतवणूक असेल तर अशाने वैयक्तिक कर्ज न घेता मुदत ठेवींवर कर्ज घ्यावे. बँकेत मुदत ठेवीत गुंतविलेल्या रकमेच्या ९० टक्के रकमेपर्यंत कर्ज मिळू शकते. मुदत ठेवीचे व्याज मुदतपूर्तीनंतर घेणार अशा प्रकारे गुंतवणूक केली असेल तर त्यावर जमा झालेले व्याज मूळ रकमेत समाविष्ट करून त्या रकमेच्या ९० टक्केपर्यंत कर्ज मिळू शकते. तुम्हाला बँक तुमच्या मुदत ठेवीवर ज्या दराने व्याज देते त्यापेक्षा एक ते दोन टक्के अधिक दराने या कर्जावर व्याज आकारले जाते. जर तुमच्या मुदत ठेवीवर बँक तुम्हाला ९ टक्के दराने व्याज देत असेल तर या ठेवींवर घेतलेल्या कर्जावर १० किंवा ११ टक्के दराने व्याज आकारणार. आयकर कायद्याच्या ८० सी अन्वये पाच वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीच्या मुदत ठेवींवर मात्र कर्ज दिले जात नाही. हे कर्ज दोन प्रकारे वापरता येऊ शकते. कर्जाची पूर्ण रक्कम एकदम ताब्यात घेणे किंवा खात्यात कर्जाच्या रकमेचा ‘ओव्हरड्राफ्ट’ घेणे व गरज असेल तशी रक्कम वापरणे. सर्व रक्कम एकदम ताब्यात घेतल्यास कर्ज घेतलेल्या दिवसापासून सर्व रकमेवर व्याज आकारले जाणार. जर खात्यात ‘ओव्हरड्राफ्ट’ घेतला तर जितकी रक्कम वापरली जाणार तेवढ्या रकमेवरच व्याज आकारले जाणार. गरज नसताना पूर्ण रकमेवर व्याज भरावे लागणार नाही.
सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज ः तुमच्या सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज संमत करण्याच्या दिवशी जी ‘मार्केट व्हॅल्यू’ असेल त्याच्या ७५ टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. घरात सोन्याचे दागिनेच नाहीत अशी घरे भारतात फार कमी असतील. भारतीयांना सोन्याचे प्रचंड आकर्षण आहे. सुवर्ण कर्ज मुळात एक वर्षासाठी दिले जाते व एक वर्षानंतर त्यावेळचा सोन्याचा भाव काय आहे हे पाहून कर्जाची मर्यादा वाढविली जाते. यावर कर्ज देताना तुमची सोन्याच्या दागिन्यांची रसिट किंवा बिल विचारात घेतले जात नाही. बँकांची बाहेरची यंत्रणा असते, ती यंत्रणा सोने चोख आहे की नाही? वजन किती आहे? वगैरेची माहिती बँकेला देते व त्यानुसार किती कर्ज संमत करता येईल याचा निर्णय बँक घेते. या कर्जावर किमान ११.२५ टक्के व्याजदर सध्या आहे. तुमच्या सोन्याच्या दागिन्यांच्या मूल्याच्या ५० ते ६० टक्के इतकी रक्कमच तुम्ही कर्ज म्हणून घेतली तर तुम्हाला व्याजाचा दर कमी आकारला जातो. मुधून फायनान्स व मनापूरम फायनान्स या दोन सोने तारण ठेवून कर्ज देणार्‍या अग्रेसर कंपन्या आहेत.
प्रॉपर्टी तारण ठेवून कर्ज ः स्थिर मालमत्तेच्या रकमेच्या ५० ते ६० टक्के किंवा तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम प्रॉपर्टी तारण ठेवून कर्ज म्हणून मिळू शकते. हे कर्ज ५ वर्षांपासून ते १५ वर्षांच्या कालावधीसाठी मिळू शकते. यावर सध्या किमान व्याजाचा दर १२.५० टक्के आहे. हे कर्ज संमत होण्यास बराच वेळ लागतो. कर्ज संमत प्रक्रिया दीर्घ आहे. ज्यांची गरज कमी रकमेची आहे अशांनी प्रॉपर्टी तारण ठेवून कर्ज घेऊ नये.
इतर गुंतवणुकीतून कर्ज उभारणी ः म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, शेअर, विमा पॉलिसी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, किसान विकास पत्र, बॉण्ड यांच्या गुंतवणुकीतून हे कर्ज उभारता येऊ शकते. कर्ज देणारी वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडे म्युच्युअल फंडातील कोणत्या योजनांतील गुंतवणुकीला कर्जे द्यायची? कोणत्या कंपनीच्या शेअर्सवर कर्जे द्यायची याची यादी असते व यादीत समाविष्ट असलेल्या म्युच्युअल योजनांवर किंवा शेअर्सवर कर्ज देण्यात येते. मुंबई शेअर बाजारात ज्या कंपन्या ‘अ’ गटात आहेत त्या कंपन्यांच्या शेअरवर कर्ज मिळण्यास विशेष अडचणी निर्माण होत नाहीत. शेअर व म्युच्युअल फंड योजनांचे दर दररोज बदलत असल्यामुळे कर्ज देणारी यंत्रणा फार मोठ्या प्रमाणावर ‘मार्जिन’ ठेवून कर्ज संमत करते. अशा प्रकारच्या कर्जांवर किमान १२.५० टक्के दराने व्याज आकारले जाते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर कर्ज ः सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या खातेदाराला त्याच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर शिक्षण, लग्न, वैद्यकीय खर्च अशा कारणांसाठी कर्ज मिळू शकते. हे कर्ज वितरणासंबंधीचे खास नियम व अटी आहेत. त्यानुसारच कर्ज मिळू शकते. या योजनेवर मिळणार्‍या व्याजाच्या दरापेक्षा २ टक्के जास्त दराने कर्जावर व्याज आकारले जाते. या कर्जाची परतफेड एकदम करता येते किंवा दोन किंवा अधिक हप्त्यांत करता येते. पण कोणत्याही परिस्थितीत ३६ महिन्यांच्या आत कर्जफेड करावी लागते. खाते उघडल्यानंतर तीन आर्थिक वर्षांनंतर कर्ज मिळू शकते व हे कर्ज पाच आर्थिक वर्षे पूर्ण होईपर्यंत मिळू शकते. ६ आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेत कर्ज मिळू शकत नाही. वैयक्तिक कर्जावर भरमसाठ दराने व्याज देण्यापेक्षा वरीलपैकी कोणताही एक पर्याय स्वीकारून आपली गरज भागविता येईल.