90 हजार मतदारांची नावे वगळणार

0
0

गोवा राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

राज्यात सध्या मतदार याद्यांचे जे विशेष सखोल पुनरावलोकनाचे (एसआयआर) काम चालू आहे त्याखाली स्थलांतरित, मृत, अनुपस्थित अथवा डुप्लिकेट आढळून आलेल्या सुमारे 90 हजार एवढ्या मतदारांची नावे मतदार याद्यांतून वगळण्यात येणार असल्याची माहिती काल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या मतदार याद्यांचे मसुदे 9 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. राज्यातील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकनाचे काम आता पूर्णत्वाकडे आले असल्याचे सांगून मतदारांना वितरित केलेल्या अर्जांपैकी 96.5 टक्के अर्जांचे यापूर्वीच डिजिटायझेशन झालेले आहे. राज्यातील 11.85 लाख नोंदणीकृत मतदारांपैकी 10.55 लाख अर्ज जमा झालेले आहेत. तर फक्त 40 हजार अर्ज अद्याप जमा झालेले नाहीत असे सांगून ते आणून देण्याची अंतिम तारीख 4 डिसेंबर अशी आहे. छाननी केल्यानंतर मतदार याद्यांचे मसुदे 9 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होतील. त्यावर दावे व आक्षेपासाठी 9 डिसेंबर ते 8 जानेवारी 2026 पर्यंतची मुदत असेल, असे श्री. गोयल यांनी स्पष्ट केले.

सुमारे 2.20 लाख मतदारांच्या नोंदी 2002 या एसआयआर नोंदीशी जुळत नाहीत. त्याचे मुख्य कारण त्यांच्या पालकांची नावे पूर्वीच्या यादीत नाहीत. या मतदारांची नावे मसुदा मतदार याद्यांत समाविष्ट केली जातील. पण त्यांना भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यात 2002 च्या एसआयआरमधील पालकांची माहिती किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने विहित केलेल्या इतर कागदपत्रांचा समावेश असेल, असेही श्री. गोयल यानी सांगितले.

एसआयआरसाठी मुदतवाढ
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने गोव्यासह 12 राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांना मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकनाचे (एसआयआर) काम पूर्ण करण्यास आठवडाभराची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे आता गोव्याला मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकनाचे काम पूर्ण करण्यास तसेच मतदान केंद्रांसंबंधीचे काम पूर्ण करण्यास 11 डिसेंबरपर्यंतचा अवधी मिळणार आहे. तसेच मतदार याद्यांचे मसुदे तयार करणे व अन्य कामांसाठी 12 ते 15 डिसेंबर 2025 पर्यंतचा अवधी मिळणार आहे.