9 महिने 14 दिवसांनी पृथ्वीवर परतल्या सुनीता विल्यम्स

0
3

>> अंतराळवीर बुच विल्मोर, निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेही परतले; स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलची ‘नासा’ला मदत

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 9 महिने व 14 दिवसांनी पृथ्वीवर परतले. त्यांच्यासोबत क्रू-9 चे आणखी दोन अंतराळवीर होते. त्यात अमेरिकेचे निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांचा समावेश आहे. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान भारतीय वेळेनुसार काल पहाटे 3.28 वाजता फ्लोरिडाच्या समुद्रात उतरले. यावेळी नासाची टीम अंतराळवीरांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होती. अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

खरे तर, सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे गेल्या 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) वर पोहोचले होते. तेे केवळ 8 दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. अंतराळ स्थानकात दोघेही आठ दिवस संशोधन करून परतणार होते. मात्र, त्यांच्या बोईंग स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना 286 दिवस तिथेच घालवावे लागले. काल अंतराळवीर सुनीता विल्यम्स ह्या सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या. पहाटे 3.28 च्या सुमारास त्यांचे स्पेस ड्रॅगन क्रू कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्रात उतरले.

सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पेसएक्स या खासगी आंतराळ संशोधन कंपनीच्या मदतीने मोहीम आखली होती. स्पेसएक्सच्या अवकाशयानाने क्रू-9 ड्रॅगन या अवकाशयानाने 14 मार्च रोजी त्या दोघांसह अन्य दोन अंतराळवीरांना परत आणण्यासाठी पृथ्वीवरून उड्डाण केले आणि काल पहाटे ते यान त्या अंतराळवीरांना घेऊन परतले. जेव्हा हे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात आले तेव्हा त्याचे तापमान 1650 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. या काळात सुमारे 7 मिनिटे संपर्क तुटला, म्हणजेच अंतराळयानाशी कोणताही संपर्क झाला नाही.
नासाने विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलची निवड केली होती. स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्स्यूल हे एक अत्याधुनिक अंतराळ यान आहे, जे उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने विकसित केले आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परत आणण्यासाठी या यानाचा वापर करण्यात आला.

समुद्रात लँड होताच डॉल्फिनने घेरले!
सुनीता विल्यम्स यांची ड्रॅगन कॅप्सूल जेव्हा फ्लोरिडाच्या समुद्रात लँड झाली, त्यावेळी एक सुंदर दृश्य पाहायला मिळाले. जेव्हा सुनीता विल्यम्स आणि तिच्या साथीदारांना कॅप्सूलमधून बाहेर काढले जात होते, तेव्हा कॅप्सूलभोवती अनेक डॉल्फिन पाहायला मिळाले. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
ड्रॅगन कॅप्सूलची 49 यशस्वी उड्डाणे
ड्रॅगन कॅप्सूल हे यान कार्गो ड्रॅगन आणि क्रू ड्रॅगन अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मोहिमेसाठी क्रू ड्रॅगन या यानाचा वापर करण्यात आला. जे खास अंतराळवीरांना घेऊन जाण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे कॅप्सूल बनवल्यापासून आतापर्यंत 49 वेळा लाँच (उड्डाण) करण्यात आले आहे. यापैकी 44 वेळा या कॅप्सूलने अंतराळ सफर केली आहे. बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकाला भेट दिली आहे.

परतीच्या मोहिमेसाठी 17 तास लागले
ड्रॅगन कॅप्सूल वेगळे झाल्यापासून ते समुद्रात उतरेपर्यंत सुमारे 17 तास लागले. 18 मार्च रोजी सकाळी 8.35 वाजता अंतराळयानाचा दरवाजा उघडला गेला. 10.35 वाजता अंतराळयान अंतराळ स्थानकापासून वेगळे झाले. 19 मार्च रोजी पहाटे 2.41 वाजता डीऑर्बिट जळण्यास सुरुवात झाली. म्हणजेच, अंतराळयानाचे इंजिन कक्षापासून विरुद्ध दिशेने चालवण्यात आले. यामुळे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकले आणि पहाटे 3.28 वाजता फ्लोरिडाच्या समुद्रात ते उतरले.

मोहिमेदम्यान काय केले?
सुनिता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकावरील आपल्या 9 महिन्यांच्या काळात, साधारणपणे फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या या अंतराळ स्थानकाची देखभाल आणि स्वच्छता केली. याशिवाय, त्यांनी येथील जुनी उपकरणेही बदलली आणि काही वैज्ञानिक प्रयोगही केले.
नासाच्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी 150 हून अधिक प्रयोगही केले.
याच बरोबर, सुनीता विल्यम्स यांनी ‘अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला’ म्हणूनही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल 62 तास 9 मिनिटे घालवली अर्थात 9 वेळा स्पेसवॉक केले.