8 आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर त्वरित निर्णय घ्यावा

0
13

>> काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचे सभापती रमेश तवडकर यांना पत्र

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांना एक पत्र पाठवून 2022 मध्ये काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 8 आमदारांच्या विरोधातील प्रलंबित अपात्रता याचिकेवर त्वरित निर्णय घेण्याची विनंती काल केली.

काँग्रेसच्या 8 आमदारांनी 14 सप्टेंबर 2022 रोजी पक्षातून फुटून आपला वेगळा गट तयार करत त्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण केले होते. या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी 8 आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. तथापि, या अपात्रता याचिकेवर सभापतींनी अजूनपर्यंत सुनावणीस सुरुवात केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश जारी करून सुध्दा अपात्रता याचिकेवर सुनावणी घेण्यास वेळकाढूपणा केला जात आहे. या प्रलंबित याचिकेवर सुनावणी वेळेत घ्यावी; अन्यथा न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे पाटकर यांनी सभापतींना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

आमदार मायकल लोबो आणि आमदार दिगंबर कामत यांच्या विरोधातील अपात्रता याचिका नुकतीच निकालात काढण्यात आली आहे, तर 8 बंडखोर आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिका 17 महिन्यांपासून प्रलंबित आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी सुद्धा या 8 आमदारांच्या विरोधात सभापतींसमोर अपात्रता याचिका दाखल केली आहे. ही याचिका सुध्दा प्रलंबित आहे. त्यामुळे चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अपात्रता याचिकेवरील सुनावणी लवकर घेण्यासाठी एक याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवरील सुनावणी घेताना न्यायालयाने 8 आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिका वेळमर्यादेत निकालात काढावी, असा निर्देश दिला आहे.