>> मडगाव पोलिसांची पश्चिम बंगालमध्ये कारवाई
कोंब-मडगाव येथील एका सराफी व्यावसायिकाच्या सोन्याचे दागिने बनविण्याच्या कारखान्यातून 72 लाखांचे सोने लुटून फरार झालेल्या तिघा कारागिरांना मडगाव पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून पकडून गोव्यात आणले. त्यांच्याकडून 45.85 लाख रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
बाणावली येथील सराफी व्यावसायिक प्रितेश लोटलीकर यांचा कोंब-मडगाव येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात पश्चिम बंगालमधील सुप्रोकोश मोंडल, संजोय मोंडल, तपस जना हे कारागीर गेल्या दहा वर्षांपासून काम करत होते. दि. 29 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता 950 ग्रॅम सोने घेऊन हे तिन्ही कारागिर पसार झाले. त्या सोन्याची किंमत 72 लाख रुपये असल्याची तक्रार प्रितेश लोटलीकर यांनी त्याच दिवशी मडगाव पोलीस स्थानकात नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ नोंद करून तपासाला सुरुवात केली होती.
मडगावचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने पश्चिम बंगालमध्ये जाऊन तपास केला. तेथे हब्रास पोलिसांच्या मदतीने गोवा पोलिसांनी सोने लुटून फरार झालेल्या तिघाही कारागिरांना ताब्यात घेतले व काल सकाळी गोव्यात आणले. त्यांच्याकडून 45.85 लाखांचे सोने जप्त करण्यात आले. काल तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.