गोव्यातून परराज्यात मद्याची तस्करी करण्याचे प्रकार सध्या जोरात चालू असून, काल गोव्यातून केरळकडे मद्याची वाहतूक करणारे एक वाहन कर्नाटक पोलिसांनी दक्षिण कर्नाटकातील उल्लाल येथे जप्त केले. पोलिसांनी या वाहनातून तब्बल 114 गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्या ताब्यात घेतल्या असून, हे मद्य 896 लीटर एवढे आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या मद्याची किंमत 6 लाख 87 हजार रुपये एवढी आहे. या प्रकरणी वाहनचालकाला पोलिसांनी अटक केली असून, तो कारवार येथील आहे. या वाहनातून केरळातील शहाळी गोव्यात आणली जात असत आणि नंतर त्यातूनच गोव्यातील मद्याची तस्करी केरळात केली जात होती, असे तपासात आढळून आले आहे. दरम्यान, गोव्यातून केरळबरोबरच कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र आदी राज्यांत मोठ्या प्रमाणात मद्याची तस्करी करण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. महिनाभरापूर्वी गुजरात पोलिसांचे एक पथक मद्य तस्करांना अटक करण्यासाठी गोव्यात दाखल झाले होते.