69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

0
35

>> ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ सर्वोत्कृष्ट चित्रपट; अल्लू अर्जुन सर्वोत्कृष्ट अभिनेता

प्रतिष्ठेच्या 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल नवी दिल्ली येथे करण्यात आली. यंदा ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या विभागात ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने बाजी मारली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने (पुष्पा) पटकावला, तर आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनन (मिमी) यांना विभागून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा गुरुवारी सायंकाळी 5 वाजता करण्यात आली. सरदार उधम हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी पुष्पा चित्रपटाला, तर सर्वोत्कृष्ट संपादनासाठी गंगूबाई काठियावाडी सिनेमाला पुरस्कार जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार श्रेया घोषाल हिला, सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार कला भैरव यांना आरआरआर चित्रपटासाठी जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स) हिला, तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठीचा पुरस्कार पंकज त्रिपाठी (मिमी) यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट बालकलाकार भाविन रबारी (छेलो शो) ठरला. विशेष ज्युरी पुरस्कार विष्णू वर्धन यांना शेरशाह या चित्रपटासाठी मिळाला, तर राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट गांधी आणि कंपनी ठरला. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार एम. एम. किरवानी (आरआरआर) आणि देवी श्री प्रसाद (पुष्पा) यांना विभागून जाहीर झाला.

मराठी चित्रपटांचा डंका
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यंदाही मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळाला. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. तसेच ‘गोदावरी’साठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला.