68 न्यायाधीशांच्या पदोन्नतीला स्थगिती

0
3

>> राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांचाही समावेश

गुजरातमधील कनिष्ठ न्यायालयातील 68 न्यायाधीशांच्या पदोन्नतीला सर्वोच्च न्यायालयाने काल स्थगिती दिली. याबरोबरच सध्या ज्या न्यायाधीशांची पदोन्नती झाली आहे, त्यांना त्यांच्या मूळ पदावर (जुन्या पदावर) परत पाठवावे, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या 68 न्यायाधीशांमध्ये राहुल गांधींना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवून शिक्षा सुनावणारे न्यायाधीश हरीश वर्मा यांचाही समावेश आहे.

न्यायमूर्ती एम. आर. शहा म्हणाले की, भरती नियमांनुसार, पदोन्नतीचा निकष म्हणजे गुणवत्ता-ज्येष्ठता आणि योग्यता चाचणी. अशा स्थितीत राज्य सरकारने जारी केलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश संवर्गातील न्यायिक अधिकारी रवी कुमार मेहता आणि सचिन मेहता यांनी या बढत्यांना आव्हान दिले होते. याचिकेत त्यांनी गुजरात उच्च न्यायालयाने 10 मार्च रोजी जारी केलेली पदोन्नती यादी आणि गुजरात सरकारने जारी केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली होती. दरम्यान, पदोन्नती मिळालेले सर्वजण सध्या गुजरात न्यायिक अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत.