6 जुलैपर्यंत मान्सूनचा वेग मंदावलेला राहणार : स्कायमेट

0
11

‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने आगामी चार आठवडे म्हणजेच 6 जुलैपर्यंत देशभरात मान्सून अगदी कमकुवत असेल, असा अंदाज वर्तवला असून, याचा फटका देशातील शेतीला बसणार आहे.
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार पुढील महिनाभर देशात मान्सूनची प्रगती होणार नसून, त्यामुळे कृषी क्षेत्राचे फार मोठे नुकसान होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मान्सूनच्या आगमनानंतर देशात जून महिन्यातच शेतीच्या कामांना सुरुवात होते. त्यामुळे चालू जून महिन्यात पाऊस बरसला नाही तर देशभरातील शेतीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गोव्यातही पेरणीवर परिणाम
देशातील अन्य भागांप्रमाणेच गोव्यातील शेतकरी देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसानेही राज्यात हजेरी लावली नव्हती आणि आता अर्धा जून महिना कोरडा गेल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यातील भातशेतीची, पेरणीची कामे पावसाच्या अभावामुळे अडली आहे. मे महिन्याप्रमाणे राज्यात जूनमध्ये ऊन पडू लागलेले असून, अशा प्रकारे जून कोरडा गेल्याचे चित्र मागील काही वर्षांत पाहिले नव्हते, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.