54व्या ‘इफ्फी’चे रंगढंग

0
31
  • बबन भगत

गेल्या 20 वर्षांपासून राज्यात ‘इफ्फी’चे यशस्वीपणे आयोजन केले जात असून आता ‘इफ्फी’चा ग्राफ दरवर्षी वरच चढताना दिसत आहे. ब्रॅण्ड गोवा बनलेल्या ‘इफ्फी’ने आता कात टाकली असून ‘इफ्फी’चा दर्जा कालानुरूप वाढू लागला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदा नेटकेपणाने आयोजित झालेला ‘इफ्फी- 2023′ हा चित्रपटप्रेमी, चित्रपट अभ्यासक, चित्रपट क्षेत्रातले कलाकार, चित्रपट क्षेत्रातील विद्यार्थी व रसिक या सर्वांसाठी खूप काही देणारा ठरला.

कोणतीही चित्रपट-संस्कृती नसलेला गोवा हे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीचे कायम स्थळ झाले त्याला आता तब्बल 20 वर्षे झाली. गेल्या 20 वर्षांपासून राज्यात ‘इफ्फी’चे यशस्वीपणे आयोजन केले जात असून आता ‘इफ्फी’चा ग्राफ दरवर्षी वरच चढताना दिसत आहे. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्रातील तत्कालीन माहिती आणि प्रसारणमंत्री सुषमा स्वराज यांनी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना ‘इफ्फी’ गोव्यात नेण्याचा प्रस्ताव दिला; आणि एक अत्यंत यशस्वी व क्रियाशील राजकीय नेता अशी ओळख असलेल्या मनोहर पर्रीकर यांनी हा प्रस्ताव स्वीकारून ‘इफ्फी’च्या आयोजनासाठीचे इंद्रधनुष्य लीलया पेलून दाखवले. त्यासाठी लागणारी साधनसुविधा त्यांनी विक्रमी वेळेत उभी करून तर दाखवलीच, शिवाय पहिल्याच वर्षी राज्यात ‘इफ्फी’चे एवढे सुंदररीत्या आयोजन केले की सगळ्यांचे डोळे दिपून गेले. नंतर गोवा हे ‘इफ्फी’साठीचे कायम स्थळच बनले. याचे श्रेय अर्थातच मनोहर पर्रीकर यांना जाते. चित्रपट या क्षेत्राविषयीची आवड नसतानाही पर्रीकर यांनी राज्यात ‘इफ्फी’चे असे काही आयोजन करून दाखवले की सांगायची सोय नाही.

ब्रॅण्ड गोवा बनलेल्या ‘इफ्फी’ने आता कात टाकली असून ‘इफ्फी’चा दर्जा कालानुरूप वाढू लागला असल्याचे दिसत आहे. वेगवेगळ्या राज्यांतून येणारे प्रतिनिधी असोत अथवा चित्रपटकर्मी- सगळ्यांना आता गोव्यात होणारा ‘इफ्फी’ आवडू लागलेला आहे. मात्र, प्रारंभीची दोन वर्षे हाच ‘इफ्फी’ गोव्यात आयोजित करण्यास काही राज्यांतील चित्रपटकर्मी व चित्रपटप्रेमींचा विरोध होता. दक्षिणेतील राज्ये व बंगालसारख्या राज्यातील हे चित्रपटकर्मी व चित्रपटप्रेमी होते. गोव्यात चित्रपट संस्कृती नाही, येथे ‘इफ्फी’चे चांगल्याप्रकारे आयोजन होत नाही, अशी त्यांची तक्रार होती. नंतर मात्र यांच्या तक्रारीचा हा सूर क्षीण होत गेला. आणि आता तर हा तक्रारीचा सूर कौतुकाच्या सुरात रूपांतरित झालेला आहे. देशी-विदेशी चित्रपटकर्मी व सिनेरसिक आता या महोत्सवाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. गोव्यातील ‘इफ्फी’चे स्थळ तर त्यांना भुरळ घालते आहेच, शिवाय गोव्याच्या लोकांकडून होणारे आदरातिथ्य हाही आता त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.

यंदाच्या ‘इफ्फी’तील ‘इंडियन पॅनोरमा’ विभागातील चित्रपटात काम केलेल्या एका अभिनेत्याने ‘इफ्फी’तील पत्रकार परिषदेतून व्यक्त केलेल्या ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’विषयीच्या भावना या दखल घेण्याजोग्या तर होत्याच, शिवाय ‘इफ्फी’शी संबंधित सगळ्यांना गर्व वाटावा अशाही त्या होत्या. तो म्हणाला होता- “मी गोव्यात होणाऱ्या ‘इफ्फी’साठी प्रथमच आलोय. येथे आलो आणि ‘इफ्फी’ महोत्सव पाहून मी भारावूनच गेलो. सुंदररीत्या सजवलेला हा परिसर, लोकांकडून होणारे आदरातिथ्य, एकापेक्षा एक असे सुंदर कार्यक्रम आणि या कार्यक्रमांचे काटेकोरपणे केले जाणारे आयोजन हे सगळे दृष्ट लागावे असेच आहे. ठरलेल्या वेळी विनाविलंब कार्यक्रम सुरू होतात आणि अगदी ठरलेल्या वेळी संपतात. या आयोजनाचे किती कौतुक करावे तेच मला कळत नाही. ‘इफ्फी’चा परिसर तर एवढा सुंदर आहे की आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी याच्यापेक्षा सुंदर असे स्थळ असूच शकत नाही. मी घरी फोन करून माझ्या कुटुंबीयांनाही ‘इफ्फी’विषयी सांगितले. त्यांनाही ‘इफ्फी’विषयीची माहिती ऐकून आनंद झाला.” हे सगळं अगदी विलक्षण असे आहे, असे त्याचे म्हणणे होते. इफ्फीसाठी येणारे प्रतिनिधी व चित्रपटकर्मी यांच्याकडून यंदा अशा प्रकारच्या स्तुती करणाऱ्या कैक प्रतिक्रिया ऐकू मिळाल्या. सगळ्या प्रतिक्रिया काही येथे देणे शक्य नाही. त्यामुळे वरील प्रतिक्रियेकडे एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्हणून पाहणेच योग्य होईल.

नूतनीकरण केलेल्या कला अकादमीच्या इमारतीचा यंदा ‘इफ्फी’तील चित्रपट दाखवण्यासाठी वापर करण्यात आला नाही. मात्र, यंदा कला अकादमी ‘इफ्फी’तील मास्टर क्लासेस व इन कन्व्हर्सेशन (संवादाचा कार्यक्रम) यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यामुळे देश-विदेशांतील दिग्गज अशा चित्रपट कलाकारांचे मास्टर क्लासेस व इन कन्व्हर्सेशन कार्यक्रम कला अकादमीत झाले. त्यात यंदाचा सत्यजीत रे जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेले अमेरिकी चित्रपट निर्माते व अभिनेते मायकल डग्लस, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, बॉलिवूडमधील नामवंत दिग्दर्शक मधुर भंडारकर, बॉलिवूडमधील नामवंत अभिनेते मनोज वाजपेयी, अभिनेत्री राणी मुखर्जी अशा कित्येक कलाकारांच्या मास्टर क्लासेस व संवादाच्या कार्यक्रमांचा समावेश होता.
‘मानवी सृजन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील एका संवादाच्या कार्यक्रमातून बोलताना शेखर कपूर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी कलाकारांनी भय बाळगण्याचे कारण नसल्याचे सांगताना मानवी सृजनावर कृत्रिम बुद्धिमत्ता कधीही मात करू शकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा अधोरेखित केल्या. सृजन हे मानवी भाव-भावनांतून जन्माला येत असते. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेकडे कोणत्याही भाव-भावना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राणी मुखर्जी यांनी सिनेमाच्या पडद्यावरून धाडसी महिलांच्या व्यक्तिरेखा रंगवण्याचा आपला अनुभव कथन केला, तर जुन्या काळातील नामवंत खलनायक रणजीत, रझा मुराद, किरण कुमार व गुलशन ग्रोव्हर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपण खलनायक कसा रंगवला याविषयीची माहिती दिली. याशिवाय अन्य विविध कलाकारांचे मास्टर क्लासेस व संवादाचे कार्यक्रम हे यंदाच्या ‘इफ्फी’ची शान वाढवणारे असेच होते. अत्यंत सुंदररीत्या या कार्यक्रमांचे केलेले आयोजन व ‘इफ्फी’ प्रतिनिधींनी या कार्यक्रमांना भरभरून दिलेला प्रतिसाद हे या वर्षीच्या ‘इफ्फी’तील मुख्य अशा वैशिष्ट्यांपैकी एक होते. विशेषकरून दक्षिण भारतातून आलेल्या सिनेरसिकांनी या मास्टर क्लासेस व संवादाच्या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद दिला. दाक्षिणात्त्य अभिनेता विजय सेतूपथी याच्या मास्टर क्लासला तर प्रचंड झुंबड उडाली. कला अकादमीतील थिएटरमधील सगळ्या खुर्च्या भरून तर गेल्या होत्याच, शिवाय आत प्रवेश न मिळाल्याने कित्येक जणांना हिरमुसले होऊन परत जावे लागले होते. ‘इफ्फी’तील मास्टर क्लासेस व संवादाचे कार्यक्रम किती यशस्वी ठरले हे प्रतिनिधींकडून कार्यक्रमांना मिळालेल्या या प्रतिसादावरून स्पष्ट होते.

चित्रपट महोत्सव हा चित्रपटांचे दालन देश-विदेशांतील चित्रपटकर्मी व रसिकांसाठी खुले करण्यासाठी आयोजित करण्यात येतो. यंदाच्या ‘इफ्फी’तील चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास ‘इफ्फी’त संमिश्र असे चित्रपट होते अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. देशी-विदेशी चित्रपटांचे गोव्यातील एक अभ्यासक व गेल्या 20 वर्षांपासून ‘इफ्फी’चे वार्तांकन करणारे गोमंतकीय पत्रकार रामनाथ पै रायकर हे यंदाच्या ‘इफ्फी’तील चित्रपटांविषयी बोलताना म्हणाले की, यंदा ‘इफ्फी’त संमिश्र असे चित्रपट होते. काही चित्रपट हे दर्जाच्या दृष्टीने निराशाजनक असे होते व नव्याने निर्मिती करण्यात आलेल्या कित्येक चांगल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा त्यात अभाव होता. पण त्याबरोबर या वर्षी ‘कान’ चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झालेला ‘ॲनाटोमी ऑफ अ फॉल’सारख्या चित्रपटाबरोबरच पुनर्संचयन केलेले काही जुने अभिजात चित्रपटही ‘इफ्फी’त होते. त्याचबरोबर कला अकादमीत दिग्गज अशा चित्रपटकर्मींचे मास्टर क्लास व ‘इन कन्व्हर्सेशन’ हे कार्यक्रम मनोरंजन करणारे तसेच माहितीपूर्ण होते, असे रायकर म्हणाले.

चांगल्या माहितीपटांचा अभाव ः अरविंद सिन्हा
दरम्यान, यंदाच्या ‘इफ्फी’त चांगल्या व दर्जेदार अशा माहितीपटांचा अभाव दिसून आल्याचे, तसेच माहितीपटांची संख्याही कमी असल्याचे ‘इफ्फी’च्या पत्रकार परिषदेतून बोलताना इंडियन पॅनोरमा विभागाच्या नॉन फिचर फिल्मसाठीचे ज्युरी चेअरमन अरविंद सिन्हा यांनी स्पष्ट केले होते. भारतात आता माहितीपटांची संख्या कमी होऊ लागली असून दर्जाही घसरू लागलेला आहे. त्यामुळे यंदाच्या ‘इफ्फी’त नॉन फिचर फिल्म्ससाठीच्या विभागाचे दालन समृद्ध होऊ शकले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तुलनेने शॉर्ट फिल्म्सची संख्या जास्त होती. शॉर्ट फिल्म्स करणाऱ्यांना पुढे फिचर फिल्म करण्याची संधी मिळू शकते. माहितीपट करणाऱ्यांना ती संधी मिळत नाही. तसेच माहितीपट तयार करण्यासाठी बरेच संशोधन करावे लागते. त्यामुळे माहितीपटांची निर्मिती करण्याकडे दुर्लक्ष केले जात असावे, असे त्यांचे म्हणणे आहे. मागच्या काही ‘इफ्फीं’ची या ‘इफ्फी’शी तुलना केल्यास अरविंद सिन्हा यांचे म्हणणे खरे आहे असेच म्हणावे लागेल. यंदाच्या ‘इफ्फी’त ‘1947 ः ब्रेकझिट इंडिया’ हा एकच दखल घेण्याजोगा माहितीपट होता. ‘इस्ट इंडिया कंपनी’ने भारतात कसा प्रवेश केला व एक देश म्हणून उदयास न आलेल्या या प्रदेशावर कब्जा करीत त्याला आपली वसाहत कशी बनवली व नंतर 1947 साली कोणत्या परिस्थितीत भारत-पाकिस्तान अशी फाळणी करीत या प्रदेशातून कसा काढता पाय घेतला याचे सुंदर चित्रण या माहितीपटातून करण्यात आलेले आहे. दुर्दैवाने यंदाच्या ‘इफ्फी’त त्याच्या तोडीचा दुसरा माहितीपट नव्हता. चांगल्या व दर्जेदार अशा शॉर्ट फिल्म्सच्या बाबतीतही यंदा ‘इफ्फी’ने निराशाच केली.

मराठी चित्रपटांकडून निराशा
गेल्या काही वर्षांपासून इंडियन पॅनोरमातील फिचर फिल्म विभाग गाजवणारा मराठी चित्रपट यंदा मात्र एवढा मागे पडला की ‘इफ्फी’साठी एकाही मराठी चित्रपटाची निवड होऊ शकली नाही. केवळ नॉन फिचर फिल्म गटात दोन मराठी शॉर्ट फिल्म्स होत्या. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही यंदा अभावानेच ‘इफ्फी’त दिसले. मराठीतील आघाडीच्या नटांपैकी केवळ स्वप्निल जोशी हा एकच अभिनेता यंदा ‘इफ्फी’त दृष्टीस पडला.

नेटके आयोजन
काही किरकोळ गोष्टी सोडल्यास यंदा ‘इफ्फी’चे आयोजन हे दिमाखदारपणे झाले असेच म्हणावे लागेल. यंदा ‘इफ्फी’साठी 7 हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली होती असे आयोजकांनी स्पष्ट केलेले असले तरी एवढी गर्दी काही इफ्फीस्थळी दिसली नाही. त्यामुळे आयोजकांनी एकतर हा आकडा उगीच फुगवून सांगितला असावा किंवा नोंदणी केलेल्यांपैकी बऱ्याच प्रतिनिधींनी ‘इफ्फी’कडे पाठ फिरवली असावी, असेच म्हणावे लागेल.
‘75 क्रिएटिव्ह माईंड्स’ हे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही ‘इफ्फी’चे एक खास आकर्षण होते. या 75 जणांमध्ये यंदा दोन ते तीन गोमंतकीय होते, हीसुद्धा गोव्यासाठी एक अभिमानाची अशी बाब म्हणावी लागेल.

सिनेमेळा
सिनेमेळा हे यंदाच्या ‘इफ्फी’चे आणखी एक वैशिष्ट्यच होते. मांडवी किनारी नव्यानेच उभारण्यात आलेल्या योगसेतूवर ‘इफ्फी’निमित्त यंदा सिनेमेळाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या ‘इफ्फी’चे हे एक नवे आकर्षण होते. कला, संस्कृती, अन्न व सिनेमा यांचा आनंद साजरा करणे हा या सिनेमेळ्याचा उद्देश असल्याचे व ‘इफ्फी’साठी प्रतिनिधी म्हणून नोंदणी न केलेल्या लोकांसाठी हा सिनेमेळा असल्याचे ‘इफ्फी’च्या आयोजकांनी स्पष्ट केले होते. मात्र, या सिनेमेळ्याला लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद काही मिळाला नाही.
यंदा ‘इफ्फी’निमित्त पणजी, हणजुण व मडगाव येथे मोकळ्या जागेत (ओपन स्क्रिनिंग) चित्रपट दाखवण्यात आले. पणजी, मिरामार, मडगाव येथे रवींद्र भवन व हणजुण येथे ही सोय करण्यात आली होती. ‘इफ्फी’ गोव्यात आल्यानंतरच अशा प्रकारे मोकळ्या जागेत चित्रपट दाखवण्याची ही संकल्पना उदयास आली आणि ती यशस्वीही झाली. पण प्रत्येक वर्षी ‘इफ्फी’त हे ओपन स्क्रिनिंग झाले असे मात्र नाही. सुरुवातीच्या काळात म्हणजे मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री होते त्या काळात हे ओपन स्क्रिनिंग गोमंतकीयांसाठी मोठे आकर्षण ठरले होते आणि विविध शहरे व गावांतील लोक या ओपन स्क्रिनिंगस्थळी मोठी गर्दी करताना दिसत होते. पण तशा प्रकारचे ओपन स्क्रिनिंग आता होताना दिसत नाही. त्याबाबत प्रतिक्रिया देताना एक युवक म्हणाला की, इफ्फीच्या ओपन स्क्रिनिंगची जादू आता संपल्यातच जमा आहे. आणि त्याचे ते म्हणणे बऱ्याच अंशी खरेही होते.
तर नेटकेपणाने आयोजन झालेला इफ्फी- 2023 हा चित्रपटप्रेमी, चित्रपट अभ्यासक, चित्रपट क्षेत्रातले कलाकार, चित्रपट क्षेत्रातील विद्यार्थी व रसिक या सर्वांसाठी खूप काही देणारा असा ठरला असेच म्हणावे लागेल.

‘इफ्फी’ आणि आश्वासने
‘इफ्फी’चा उद्घाटन सोहळा व समारोप सोहळा याचे इफ्फीचे प्रतिनिधी, चित्रपटकर्मी, तसेच गोमंतकीय यांना खास आकर्षण असते. या सोहळ्यांना दरवर्षी उसळणारी गर्दी हा त्याचा पुरावा आहे. इफ्फीत सहभागी होऊ न शकणाऱ्या गोमंतकीयांना निदान इफ्फीच्या उद्घाटन व समारोपाच्या सोहळ्यात तरी सहभागी होता यावे यासाठी गोवा सरकार बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये इफ्फीच्या उद्घाटन व समारोप सोहळ्याचे आयोजन करीत असते. या सोहळ्यांत होणारा बॉलिवूडमधील कलाकारांचा नाच-गाण्यांचा कार्यक्रम याचे गोमंतकीयांना आकर्षण असते.
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री यांचे भाषणही होत असते. या भाषणातून इफ्फीशी संबंधित वेगवेगळी आश्वासने देण्यात येत असतात. तशी आश्वासने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळीही दिली. यंदाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना प्रमोद सावंत यांनी गोवा सरकार भविष्यात गोवा हे चित्रपटनिर्मितीसाठीचे एक केंद्र बनवण्यासाठी काम हाती घेणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर राज्यात चित्रपटनगरी उभारण्यात येणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले. समारोप सोहळ्यातून बोलताना त्यांनी जास्तीत जास्त चित्रपटनिर्मात्यांनी राज्यात चित्रीकरणासाठी यावे यासाठी लाल पायघड्या घालून गोवा सरकार त्यांचे स्वागत करील, आणि त्यांना राज्यात चित्रीकरणासाठीचा परवाना कोणत्याही अडचणीशिवाय सुलभपणे मिळू शकेल याकडे लक्ष देईल असेही स्पष्ट केले.

बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती
यंदा इफ्फीसाठी बॉलिवूडमधील कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सलमान खान, सनी देओल, माधुरी दीक्षित, शाहीद कपूर, शेखर कपूर, करण जोहर, झोया अख्तर, आयुष्मान खुराना, मनोज वाजपेयी, गुलशन ग्रोव्हर, पूजा भट, ज्येष्ठ अभिनेते रणजीत, रझा मुराद, किरण कुमार व बॉलिवूडमधील अन्य छोटे-मोठे कलाकार अशी कलाकारांची मांदियाळीच यंदाच्या इफ्फीमध्ये होती. त्यांचे पाय इफ्फीस्थळाला लागल्याने इफ्फीला ‘चार चाँद’ लागले हे मान्य करावेच लागेल.

‘सम्राट’ आणि ‘अशोक’चा वापर
यंदा कला अकादमी थिएटरचा चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासाठी वापर करता न आल्याने झांट्ये कंपनीच्या ‘सम्राट’ आणि ‘अशोक’ या दोन छोट्या थिएटर्सचा चित्रपट दाखवण्यासाठी वापर करण्यात आला. ही थिएटर्स इफ्फीच्या मुख्य स्थळापासून खूप जवळ असल्याने त्याचा चांगला फायदा झाला असेच म्हणावे लागेल. मात्र ही थिएटर्स खूपच लहान असल्याने या थिएटर्सचा ‘रिपीट शो’साठीच वापर करण्यात आला.

सत्यजीत रे जीवन गौरव पुरस्कार
भारतातील एक महान व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपटकर्मी व ऑस्कर पुरस्कार प्राप्त झालेले दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या नावाने इफ्फीत दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका महान अशा चित्रपटकर्मीचा सत्यजीत रे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो. यंदा हा पुरस्कार दोन ऑस्कर पुरस्कारांसह अन्य कित्येक पुरस्कार प्राप्त झालेले अमेरिकी अभिनेते व निर्माते मायकल डग्लस यांना प्राप्त झाला.

सत्यजीत रे यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार स्वीकारताना डग्लस हे भावनाविवश झाल्याचे पाहावयास मिळाले. आपण चित्रपटविषयक शिक्षण घेत असताना महाविद्यालयात रे यांच्या चित्रपटांचा अभ्यास केला होता. आता त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार आपणाला मिळाला हे आपण आपले भाग्य समजत आहे, अशा भावना व्यक्त करताना डग्लस यांचे डोळे पाणावले. डग्लस यांची पत्नी व पुत्रही यावेळी हजर होता.
भारतीय कलाकारांसाठी दिला जाणारा पुरस्कार यंदा अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या योगदानासाठी देण्यात आला.