>> पोलिसांकडून वाहतूक खात्याकडे कारवाईसाठी शिफारस
>> हेल्मेटशिवाय दुचाकी वाहने चालवल्याचा परिणाम
गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या काळात मागील दोन दिवसांपासून हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली असून, आत्तापर्यंत 520 दुचाकी वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता, हेल्मेट परिधान न करणाऱ्या ह्या 520 वाहनचालकांचे परवाने (ड्रायव्हिंग लायसन्स) निलंबित करण्याची शिफारस वाहतूक पोलिसांनी वाहतूक खात्याकडे केली आहे. या शिफारशीमुळे हेल्मेट न वापरणाऱ्या अन्य दुचाकीचालकांचे धाबे दणाणले आहेत. दुचाकीचालकांचे वाढती अपघाती बळी पाहता हेल्मेट सक्तीसाठी वाहतूक पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
राज्यात दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. तथापि, काही दुचाकी वाहनचालकांकडून हेल्मेट सक्तीच्या नियमाचे पालन केले जात नाही. राज्य सरकार आणि वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करून देखील काही दुचाकीचालक बेफिकीरपणे वागत असून, त्यांच्याकडून हेल्मेट परिधान केले जात नाही. राज्यातील वाहन अपघातांमध्ये दुचाकीचालकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस वाहतूक विभागाने रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेऊन हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई सुरू केली आहे. अनेक वेळा सूचना करूनही दुचाकीचालकांकडून हेल्मेट परिधान केले जात नसल्याने त्यांना मोठा दंठ ठोठावला जात आहे. त्याचबरोबरच आता हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीचालकाचे वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर काय म्हणाले?
वाहतूक पोलीस विभागाने मागील दोन दिवसांपासून हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांच्याविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे. हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीचालकांविरोधात वाहतूक खात्याकडे अहवाल पाठविला जाणार आहे. त्यानंतर वाहतूक खात्याकडून त्या दुचाकीचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाचे उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिली.
तीन वर्षांत 541 दुचाकीचालकांचा अपघाती बळी
वाहतूक पोलीस विभागाने राज्यातील रस्ता अपघाताबाबत एक अहवाल तयार केला आहे. राज्यात 2021 ते 2023 या तीन वर्षांच्या काळात 541 दुचाकीचालकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. त्यातील 357 दुचाकीचालकांनी हेल्मेट परिधान केले नव्हते, असे अहवालात म्हटले आहे.
हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही
‘हेल्मेट नाही, पेट्रोल नाही’ या असा फलक पेट्रोल पंपावर लावण्याची सूचना एका आदेशाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपमालकांना केली आहे. त्यामुळे राज्यातील काही पेट्रोल पंपमालकांनी ‘हेल्मेट नाही, पेट्रोल नाही’ अशा आशयाचे फलक लावले आहेत. वाहतूक खात्याने या सूचनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी करण्याची विनंती केली होती. तसेच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना ‘हेल्मेट नाही, पेट्रोल नाही’ या निर्णयाबाबत दुचाकी वाहनचालकांना माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.