41 मजुरांना वाचवण्यात गोव्याच्या दोघा अभियंत्यांची मोलाची भूमिका

0
23

उत्तराखंडातील बोगद्यामधील दुर्घटनेत अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठीच्या मदतकार्यात दोघा गोमंतकीय अभियंत्यांनी मोलाची भूमिका बजावली. स्वाक्ड्रॉन इन्फ्रा आणि मायनिंग प्रा. लिमिटेड या आमच्या कंपनीने तयार केलेल्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून कामगारांना सुरक्षित बाहेर करण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी आपला हातभार लावला, असे फोंडा येथील खाण अभियंता अमोघ अरुण गुडेकर आणि तिस्क-उसगाव येथील आसिफ मुल्ला यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील या गोमंतकीय अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.

मूळचे फोंड्यातील अमोघ गुडेकर आणि आसिफ मुल्ला हे दोघेही बंगळूर येथील स्वाक्ड्रॉन कंपनीमध्ये दोन वर्षापासून अभियंता म्हणून कार्यरत आहेत. उत्तराखंडातील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याच्या मोहिमेसाठी स्वाक्ड्रॉन या खाण कंपनीच्या पथकाला सहभागी होण्याची कर्नल दीपक पाटील यांनी विनंती केली. त्यानंतर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिरियाक जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकात अमोघ गुडेकर आणि आसिफ मुल्ला यांचा समावेश करण्यात आला होता. या खाण कंपनीने ड्रोनच्या साहाय्याने बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांना वाचविण्यासाठी खास तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कामगारांना वाचविण्याच्या कामासाठी आपण आराखडा तयार करून दिला. या मदतकार्यात सहभागी होण्याचा आम्हांला अभिमान आहे, असे या दोन्ही अभियंत्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

41 मजूर ‘एम्स्‌‍’मध्ये देखरेखीखाली

उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेल्या सर्व 41 मजुरांना चिन्यालीसौर येथून ऋषिकेशला ‘एम्स्‌‍’ इस्पितळात हलवण्यात आले आहे. बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे चिनूक हेलिकॉप्टर कामगारांसह ऋषिकेशला पोहोचले. एम्समध्ये सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना येथे 48 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

आम्ही सर्व कामगारांची ईसीजी केली आहे. प्रत्येकजण निरोगी आहे. त्यांचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळीही बरोबर आहे, असे एम्सचे सीईओ प्रोफेसर मीनू सिंह म्हणाले.
त्याआधी बोगद्यातून सुटका केल्यानंतर कामगारांना चिन्यालीसौरच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. तेथे त्यांनी रात्रभर विश्रांती घेतली.