उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्क्यरा बोगद्यात 41 मजूर गेल्या 9 दिवसांपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र अद्याप यश आलेले नाही.
काल सकाळी इंटरनॅशनल टनेलिंग अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रोफेसर अर्नोल्ड डिक्स हे देखील उत्तरकाशीला पोहोचले. डिक्स यांनी व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी चारपैकी दोन पॉईंट निश्चित केले आहेत. माती आणि दगड तपासल्यानंतर त्यांनी दगड खोदण्यास ही मशीन सक्षम असल्याचे सांगितले.
गुजरात आणि ओडिशा येथून आणखी दोन ड्रिलिंग मशीन येत आहेत, त्यांचे वजन सुमारे 77 टन असून ते मंगळवारपर्यंत येथे पोहोचण्याची अपेक्षा आहे. व्हर्टिकल ड्रिलिंग मशीनसाठी 1200 पैकी 900 मोटर रस्ता तयार केला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे मुख्य अभियंता जसवंत कपूर यांनी सांगितले.
दिवाळीच्या दिवशीच म्हणजे 12 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता हा अपघात झाला होता. बोगद्याच्या प्रवेश बिंदूच्या 200 मीटरच्या आत 60 मीटर माती खचली आणि 41 मजूर आत अडकले. बचाव कार्यादरम्यान बोगद्यातून आणखी दगड पडले आणि त्यामुळे ढिगारा एकूण 70 मीटरपर्यंत पसरला. बोगद्यात अडकलेले मजूर बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.