>> रिमोट कंट्रोलर उपकरण विकसित; चाचणी यशस्वी; वीजमंत्र्यांकडून कौतुक
गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 4 विद्यार्थ्यांनी वीजपुरवठ्यातील दोष त्वरित शोधण्यासाठी रिमोट कंट्रोलर उपकरण विकसित केले असून, वीज खात्याकडून या उपकरणाची 11 केव्ही ओपा फीडरवर यशस्वी चाचणी घेण्यात आली. या रिमोट कंट्रोलर उपकरणाचा शुभारंभ वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते पर्वरी येथे मंत्रालयात काल करण्यात आला. या उपकरणाच्या माध्यमातून 11 केव्ही वितरण फिडरवरील दोषपूर्ण विभाग शोधण्यात मदत होणार असून, खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा लवकर सुरळीत करण्यासाठी मदत होणार आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.
वीज खात्याने वीज पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी ग्रामीण भागात भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. राज्यातील जुन्या वीजवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यातील पर्यटन विभाग, औद्योगिक क्षेत्र, शहरे यासारख्या क्षेत्रातून भूमिगत केबल घालण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.
रिमोट कंट्रोलर उपकरण वीजपुरवठ्यातील दोषपूर्ण विभाग विभाग ओळखण्यास तसेच कमीत कमी वेळेत दोष दूर करण्यासाठी मदत करणार आहे. वीज विभागाकडून या उपकरणाची फोंडा आणि वास्को येथे पाच ठिकाणी चाचणी घेतली जाणार आहे. तसेच, वर्षभरात सुमारे 200 पेक्षा अधिक ठिकाणी दोष शोधून काढणारे रिमोट कंट्रोलर उपकरण बसविण्यात येणार आहे.
गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा. जयेश प्रियोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी रौनक चारी, फ्रेड बार्बोझा, ईश्वरी गावकर आणि उज्वला शानभाग यांनी हे उपकरण विकसित केले आहे.
यावेळी वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. विवेक कामत व इतरांची उपस्थिती होती. यावेळी रिमोट कंट्रोलर उपकरण तयार करणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृपाशंकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. गोविंद कुंकळेयकर यांनी आभार मानले.
रिमोट कंट्रोलर उपकरण कसे काम करेल?
राज्यात पावसाळ्याच्या दिवसांत सत्तरी, धारबांदोडा, सांगे केपे व इतर दुर्गम, ग्रामीण भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होण्याचे प्रकार घडतात. वीज कर्मचाऱ्यांना वीज फिडरवरील दोष शोधण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने फिडरशी संबंधित सर्व विभागातील वीजपुरवठा बंद ठेवावा लागतो. या नवीन रिमोट कंट्रोलर उपकरणामुळे दोष लवकर शोधणे शक्य होणार असून, त्याच विभागातील वीजपुरवठा बंद ठेवून इतर भागांतील वीजपुरवठा सुरळीत केला जाऊ शकतो. तसेच, वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.