4 वर्षीय मुलाचा खून करून मातेचे कर्नाटकात पलायन

0
18

सिकेरी-बार्देश येथील एका हॉटेलमध्ये आपल्याच 4 वर्षांच्या मुलाचा खून करून पलायन केलेल्या मातेला कर्नाटकात काल अटक करण्यात आली. कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर चित्रदुर्ग पोलिसांनी सदर मातेला पकडले. त्यावेळी तिच्या बॅगेत त्या 4 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. तिला चित्रदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सविस्तर माहितीनुसार, बंगळुरू येथील एक महिला शनिवारी रोजी सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये उतरली होती. तिच्या सोबत 4 वर्षांचा मुलगा होता. काल सकाळी तिने हॉटेलजवळूनच बंगळुरूला जाण्यासाठी खास टॅक्सी मागवली होती. जेव्हा तिने हॉटेल सोडले, तेव्हा तिच्यासमवेत हॉटेलमध्ये आलेला चार वर्षांचा मुलगा नव्हता. त्यामुळे हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याला संशय आला. त्याने लगेचच कळंगुट पोलिसांना याची माहिती दिली. कळंगुट पोलिसांनी हॉटेलच्या खोलीत तपास केला असता रक्ताचे थेंब आढळून आले. पोलिसांनी लगेच तिला घेऊन जाणाऱ्या टॅक्सीचालकाची चौकशी केली असता ती कुठे उतरली, याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चित्रदुर्ग पोलिसांना महिलेची माहिती दिली. चित्रदुर्ग पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान करत सदर महिलेला पकडले. तिची झाडाझडती घेतली असता तिच्या बॅगमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला. या महिलेला अटक करण्यासाठी कळंगुट पोलीस चित्रदुर्गच्या दिशेने रवाना झाले आहेत.