4 वर्षीय चिमुकल्यावर बंगळुरूत अंत्यसंस्कार

0
19

पती-पत्नीतील वादात निर्दयी मातेने सिकेरी-कांदोळी येथील हॉटेलमध्ये आपल्याच ज्या 4 वर्षीय मुलाची हत्या केली होती, त्या चिमुकल्याच्या पार्थिवावर काल बंगळुरू येथील एका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील वेंकटरमण यांनी त्याच्या चितेला अग्नी दिला.

बंगळुरूस्थित एआय कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सूचना सेठ हिने आपल्या 4 वर्षीय मुलाचा निर्घृणरित्या केलेल्या खुनामुळे गोव्यात खळबळ उडाली होती. ही घटना आणि मुलाच्या हत्येमागील कारण समोर आल्यानंतर गोवा आणि कर्नाटकसह संपूर्ण देश सुन्न झाला होता. सिकेरी-कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये आपल्याच 4 वर्षीय मुलाचा खून केल्यानंतर मातेने चित्रदुर्ग-कर्नाटक येथे पलायन केले होते. या प्रकरणी आई सूचना सेठ हिला मंगळवारी अटक करण्यात आली होती.

या घटनेची माहिती दिल्यानंतर इंडोनेशियात कामानिमित्त वास्तव्यास असणारे मुलाचे वडील वेंकटरमण हे तातडीने मंगळवारी रात्रीच कर्नाटकात परतले होते. त्यानंतर ज्या इस्पितळात मुलाचे पार्थिव ठेवले होते, तेथे ते दाखल झाले. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर तालुका इस्पितळात सदर मुलाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी रात्रीच उशिरा त्याचे पार्थिव वेंकटरमण आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले.

यानंतर काल बंगळुरू येथील एका स्मशानभूमीत साश्रूनयनांनी सदर मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, मुलाच्या तोंडावर उशी टाकून अथवा गळा दाबून त्याचा खून करण्यात आला असावा, असे हिरीयुर तालुका इस्पितळाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. कुमार नाईक यांनी म्हटले आहे.

जमीन घोटाळ्याची प्रकरणे 90 टक्क्यांनी कमी
राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणाचा विशेष पोलीस पथकाद्वारे (एसआयटी) तपास सुरू केल्याने जमीन घोटाळ्याची प्रकरणे 90 टक्क्यांनी कमी झाली, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल अन्य एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. जमीन घोटाळ्याचे प्रकार 100 टक्के रोखण्यासाठी सरकार आणि नागरिक यांच्यात समन्वय हवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.