>> दोघा जागरुक नागरिकांची हुशारी; धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयात चालतोय खटला
सरकारी नोकरीच्या आमिषाने भल्याभल्यांना गंडा घालणाऱ्या पूजा नाईक आणि अजित सतरकर याला फोंड्यातील दोघा जागरुक नागरिकांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. पूजा व अजितने नोकरी देण्याच्या नावाखाली दोघांकडून प्रत्येकी 2-2 लाख रुपये घेतले; पण नोकरी मिळवून दिलीच नाही. उलट पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्या दोघा नागरिकांनी पूजाकडून धनादेश घेतला. हा धनादेश न वटल्या प्रकरणी 6 महिन्यांपूर्वी दोघांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केल्याचे समोर आले आहे.
सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून रक्कम उकळल्याची नवनवी प्रकरणे फोंडा परिसरातून समोर येऊ लागली आहेत. पूजा नाईक व अजित सतरकर या जोडगोळीने अनेकांना गंडा घातला; पण दोघा जागरुक नागरिकांनी त्यांनाच चांगली अद्दल घडवण्याचा चंग बांधला आहे.
फोंडा परिसरातील दोन व्यक्तींच्या दोन मुलांना 10 लाख रुपयांत सरकारी नोकरी देण्याचा सौदा पूजा व अजितने केला होता. आगाऊ रक्कम म्हणून प्रत्येकी 2 लाख मिळून 4 लाख रुपये त्यांनी उकळले होते. एका सरकारी खात्यात एलडीसी पदाची नोकरी फक्त 40-45 दिवसांत देण्याचे ठरले होते; पण 2020 साली दिलेल्या रकमेच्या बदल्यात सरकारी नोकरी मिळाली नसल्याने दोन्ही व्यक्ती वारंवार त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. प्रत्येकवेळी काही ना काही कारणे देऊन नोकरी पक्की मिळणार असल्याची थाप पूजाकडून दिली जात होती.
शेवटी यंदाच्या जानेवारी महिन्यात संतालेल्या त्या दोन्ही व्यक्तींनी अजित सतरकर याचे घर गाठले. दोन्ही व्यक्तींनी नोकरीसाठी दिलेली रक्कम परत करण्याची मागणी त्याच्याकडे केली. शेवटी अजित सतरकरने पूजा नाईक हिच्याशी फोनवर चर्चा करून 8 दिवसांत 4 लाख परत करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर दोन्ही व्यक्तींनी पूजा नाईकची भेट घेऊन 4 लाख रुपयांचा धनादेश देण्याची मागणी केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून पूजा नाईकने प्रत्येकी 2-2 लाख रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सोपवला. तसेच तो 8 दिवसांत वटणार असल्याचे सांगितले. मात्र 8 दिवस पूर्ण होण्याआधीच पूजा नाईकने धनादेश उशिरा जमा करण्यास सांगितले. त्यामुळे संतापलेल्या दोन्ही व्यक्तींनी ठरलेल्या वेळी धनादेश बँकेत जमा केले; पण पूजा नाईकच्या खात्यात रक्कम नसल्याने धनादेश वटला नाही. त्यानंतर त्या व्यक्तींनी पूजा नाईकने दिलेला धनादेश वटला नसल्याने आणि अजित सतरकरने लेखी दिलेले आश्वासन याची प्रत जोडून फोंडा न्यायालयात खटला दाखल केला. त्यावर दोन सुनावण्या झाल्या आहेत. पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. आपली रक्कम परत मिळवण्यासाठी दोन व्यक्तींनी दाखवलेली हुशारी सध्या फोंडा परिसरात चर्चेत आहे.