>> आयोजकांना परवानगी देणार नाही; पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती
>> आयोजकांकडून 31 च्या तिकिटांची विक्री सुरुच; केवळ 3 दिवसच मान्यता
वागातोर येथे सनबर्न संगीत महोत्सव 31 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल दिली. 31 ला वागातोरमध्ये सनबर्नचे आयोजन करण्यास हणजूणच्या स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध होता. तसेच शिवोली मतदारसंघाच्या आमदार डिलायला लोबो यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी कोणत्याही परिस्थितीत 31 ला वागातोर येथे सनबर्न होऊ देणार नाही, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 31 ला सनबर्न आयोजनास परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
येत्या 31 डिसेंबरला सनबर्न संगीत महोत्सव आयोजित करण्यास मान्यता दिली जाणार नाही. केवळ 28, 29 व 30 डिसेंबर हे तीन दिवसच संगीत महोत्सव आयोजित करण्यास परवानगी दिली जाणार आहे. संगीत महोत्सवाच्या आयोजकांना 31 रोजी संगीत महोत्सव आयोजित करण्यास मान्यता दिली जाणार नाही असे कळविण्यात आले आहे, तरी सुध्दा त्यांच्याकडून 31 डिसेंबरच्या तिकिटांची विक्री कोणत्या आधारे केली जात आहे हे कळण्यास वाव नाही, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी नमूद केले.
सनबर्न महोत्सव आयोजनाच्या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. 31 रोजी सनबर्न आयोजित करण्यास मान्यता दिल्यास अनेक समस्या निर्माण होणार आहेत. मुख्यमंत्री सुध्दा 31 रोजी सनबर्न आयोजित न करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत, असेही खंवटे यांनी सांगितले.
राज्यात येत्या 28 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान वागातोर येथे सनबर्न आयोजित करण्याची घोषणा करण्यात आलेली असून, या महोत्सवाची तिकिटे ऑनलाइन पद्धतीने विकली जात आहेत. येत्या 31 डिसेंबर रोजी सनबर्न संगीत महोत्सव आयोजित करण्यात स्थानिकांना विरोध दर्शविला होता. तसेच शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे 31 डिसेंबरला सनबर्न आयोजनास मान्यता न देण्याची विनंती केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची मागणी मागणी
केली होती.
दरम्यान, हणजूण येथील स्थानिक लोकांचा 31 डिसेंबर रोजी सनबर्न आयोजनास तीव्र विरोध होता. 31 डिसेंबर म्हणजे नव्या वर्षाची पूर्वसंध्या होय. त्यादिवशी ख्रिस्ती बांधव हे रात्रीच्या वेळी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असतात. तसेच सर्व धर्मातील लोक नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त पार्ट्या व आनंदोत्सव साजरा करण्यासाठी घराबाहेर पडत असतात. त्यादिवशी हणजूणमध्ये सनबर्न होऊ दिला, तर वाहतुकीची महाकोंडी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.