>> आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती
आरोग्य खाते 30 जानेवारीपर्यंत राज्यातील 1 लाख महिलांची स्तनकर्करोग तपासणी करणार असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. राज्यात वर्षाला सरासरी 250 ते 300 स्तनांच्या कर्करोगाचे रुग्ण राज्यात आढळत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कर्करोगाच्या रुग्णांना ‘पेरतूझुमेब’ हे कर्करोगासाठीचे औषध मोफत देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. हे औषध जर रुग्णांना योग्य वेळी देण्यात आले, तर कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे राणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील हिमोफिलियाच्या 48 रुग्णांवर गोवा सरकार मोफत उपचार करणार असल्याची माहिती राणे यांनी यावेळी दिली. त्यासाठी लागणारा निधी स्वीस येथील रोये ही बहुराष्ट्रीय कंपनी सीएसआरखाली गोवा सरकारला देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पाठीच्या कण्याला स्नायू दोष असलेल्या चार रुग्णांवरही गोमेकॉत मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या रोगाच्या उपचारासाठीचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील असून, त्यांच्यावरील उपचारासाठी सरकार दीड ते दोन कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही राणे यांनी नमूद केले.