251 खासदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे

0
9

‘एडीआर’कडून आकडेवारी सादर; संसदेत महिला खासदारांची संख्या घटली

लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात निवडून येणाऱ्या कलंकित खासदारांची संख्या वाढत चालली आहे. अठराव्या लोकसभेच्या 543 नवनिर्वाचित खासदारांपैकी तब्बल 251 (45 टक्के) खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात गुन्हेगारी आरोप असलेल्या वा सिद्ध झालेल्या सदस्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. त्याच वेळी लोकसभेतील महिला खासदारांची संख्या मात्र 77 वरून कमी होऊन 74 वर (14 टक्के) आली आहे.
असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या निवडणूक विश्लेषण संस्थेने ही माहिती दिली आहे. नवनिर्वाचित 14 टक्के महिला खासदारांमध्ये भाजपच्या सर्वाधिक 31, काँग्रेस 13, तृणमूल काँग्रेस 11, समाजवादी पक्ष 5, लोकजनशक्ती (रामविलास) 2 आणि इतर पक्षांच्या खासदार आहेत. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 539 पैकी 77 खासदार महिला होत्या.

18व्या लोकसभेचा निकाल 4 जून रोजी लागला आहे. 543 नवनिर्वाचित खासदारांपैकी 46 टक्के म्हणजेच 251 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 27 खासदारांना वेगवेगळ्या न्यायालयांनी दोषी ठरवले आहे. एडीआरच्या अहवालानुसार, कलंकित खासदारांची ही आजपर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. 251 नवनिर्वाचित खासदारांपैकी 170 जणांवर बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या 63, काँग्रेसच्या 32 आणि सपाच्या 17 खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या यादीत तृणमूल काँग्रेसचे 7, द्रमुकचे 6, तेलुगू देसम पक्षाचे 5 आणि शिवसेनेच्या 4 खासदारांची नावे आहेत.
संसदेत पोहोचलेल्या सर्वाधिक कलंकित खासदारांबद्दल बोलायचे झाले तर, केरळच्या इडुक्की मतदारसंघातून काँग्रेसचे डीन कुरियाकोसे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्यावर सुमारे 88 गुन्हे दाखल आहेत. या यादीतील दुसरे नाव काँग्रेसचे शफी पारंबील यांच्यावर 47 केसेस आहेत आणि तिसरे नाव भाजपच्या इटेला राजेंद्र यांचे आहे. त्यांच्यावर 43 केसेस दाखल आहेत.

सन 2019 मध्ये निवडून आलेल्या 233 खासदारांवर (43 टक्के) गुन्हे दाखल होते. त्या आधीच्या लोकसभेत ही संख्या 185 (34 टक्के), सन 2009 मध्ये 162 (30 टक्के) होती. सन 2004 मध्ये 125 (23 टक्के) खासदारांवर गुन्हे दाखल होते. या विश्लेषणानुसार, सन 2009पासून गुन्हेगारी खटले असलेल्या खासदारांच्या संख्येत तब्बल 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पहिल्या तीन श्रीमंत खासदारांमध्ये तेलुगू देसमचे डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी 5,705 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह अव्वल स्थानावर आहेत. दुसऱ्या स्थानावर तेलंगणचे कोंडा विश्वेश्वर रेड्डी (भाजप) आहेत. त्यांच्याकडे 4,568 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि तिसऱ्या स्थानावरील भाजपचे नवीन जिंदाल (हरयाणा) यांच्याकडे 1,241 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. पहिल्या 10 श्रीमंत खासदारांमध्ये भाजपचे पाच, टीडीपीचे तीन आणि काँग्रेसचे 2 आहेत.

भाजपच्या 94 खासदारांविरुद्ध गुन्हे
या 18व्या लोकसभेत सर्वांत मोठा पक्ष म्हणून आपले स्थान कायम ठेवणाऱ्या भाजपच्या 240 विजयवीरांपैकी सर्वाधिक 94 (39 टक्के) खासदारांनी स्वतःविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे.