25 जून ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित

0
5

केंद्र सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल ही माहिती दिली. केंद्र सरकारने राजपत्रात त्याविषयीची अधिसूचनाही जारी केली आहे. इंदिरा गांधी ह्या पंतप्रधानपदी असताना त्यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. 25 जून 1975 रोजी देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने ‘अंतर्गत अस्थैर्या’चे कारण देत आणीबाणी जाहीर केली. या घटनेला पुढील वर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला.

गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादत भारतीय लोकशाहीचा गळा घोटला होता. लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला होता. आता भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल.

दरवर्षी पाळणार; केंद्र सरकारचा निर्णय; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची माहिती; अधिसूचना जारी

आणीबाणीमागे कारण काय?

आणीबाणीची पाळेमुळे 1971 च्या लोकसभा निवडणुकीत होती, जेव्हा इंदिराजींनी संयुक्त समाजवादी पक्षाच्या राजनारायण यांचा रायबरेलीच्या जागेवर एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता; पण राजनारायण यांनी निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. 12 जून 1975 रोजी उच्च न्यायालयाने इंदिराजींची निवडणूक रद्द केली आणि त्यांना 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली.
24 जून 1975 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. पण त्यासाठी अट घातली, की इंदिरा गांधी संसदेत बसू शकतात, मात्र अंतिम निकाल लागेपर्यंत सभागृहातील कोणत्याही मतदानात भाग घेऊ शकत नाहीत. यानंतर 25 जून रोजीच आणीबाणी लागू झाली आणि त्याची घोषणा 26 जूनच्या पहाटे झाली. आणीबाणी लागू करण्यामागे रायबरेलीतील निवड रद्दबातल ठरणे हेही एक कारण सांगितले जाते.

आणीबाणी केव्हा जारी झाली?

‘राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर केली आहे. घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही’ हे ऑल इंडिया रेडिओवरून 26 जूनच्या पहाटे इंदिरा गांधींचे हे शब्द देशभर प्रक्षेपित झाले आणि प्रचंड खळबळ उडाली. आणीबाणीच्या आदेशावर तत्कालीन राष्ट्रपती डॉ. फक्रुद्दीन अली अहमद यांनी आदल्या रात्रीच स्वाक्षरी केली होती. आणीबाणीविषयी केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुतेकांना कल्पना नव्हती. घटनेच्या अनुच्छेद क्र. 352 अन्वये ‘अंतर्गत अस्थैर्या’चे कारण देत आणीबाणी जारी करण्यात आली. 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 असे जवळपास 21 महिने ती लागू होती.