23 बालकांचे बळी घेणाऱ्या ‘त्या’सिरपचा परवाना रद्द

0
1

मध्य प्रदेशमध्ये कफ सिरप घेतल्याने 23 मुलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात काल सोमवारी तामिळनाडूतील श्रेसन फार्मास्युटिकल्स कंपनीशी संबंधित मालमत्ता आणि चेन्नईतील सरकारी अधिकाऱ्यांच्या सात ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले. तसेच तामिळनाडू सरकारने कंपनीचा कोल्ड्रिफ कफ सिरप तयार करण्याचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

तामिळनाडूतील कांचीपुरम येथील श्रेसन फार्मास्युटिकल्स या कंपनीने बनवलेल्या या कफ सिरपमध्ये अत्यंत विषारी औद्योगिक रसायन आढळले होते. ज्यामुळे किडनी निकामी होते. हे कफ सिरप पाजल्यामुळे मध्य प्रदेशात 23 हून अधिक लहान मुलांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी कंपनीचा मालक जी. रंगनाथन याला मध्य प्रदेश पोलिसांनी 9 ऑक्टोबर रोजी चेन्नईतून अटक केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयानेही काही ठिकाणी छापेमारी केली आहे. विषारी सिरपच्या विक्रीतून मिळवलेला प्रचंड नफा म्हणजे गुन्हेगारीतून मिळालेले उत्पन्न आहे का याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.

कंपनी बंद करण्याचे आदेश
तामिळनाडू सरकारने तात्काळ कारवाई करत श्रेसन फार्माच्या कारखान्याची तपासणी केली. यात कंपनीत 300 हून अधिक सुरक्षा आणि उत्पादन नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यामुळे तामिळनाडू सरकारने कंपनीचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करून कंपनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या गंभीर प्रकरणी सरकारी अधिकारी आणि कंपनी मालक यांच्यातील संगनमताची सखोल चौकशी सुरू आहे.