22,217 पैकी 22,030 निवडणूक रोखे वटवले

0
20

>> सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून प्रतिज्ञापत्र सादर

सर्वोच न्यायालयाच्या आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) अखेर निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. एसबीआयने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 1 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 22 हजार 217 निवडणूक रोखे खरेदी करण्यात आले. त्यापैकी 22,030 निवडणूक रोखे विविध राजकीय पक्षांनी वटवले.
स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याविषयी प्रतिज्ञापत्र दाखल केले. निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे, असे प्रतिज्ञापत्रात दिनेश कुमार यांनी म्हटले आहे.
या प्रतिज्ञापत्रानुसार, 1 एप्रिल 2019 ते 11 एप्रिल 2019 दरम्यान एसबीआयकडून 3,346 निवडणूक रोख्यांची खरेदी केली गेली. यापैकी 1,609 रोखे वटवण्यात आले. तसेच 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत 18,871 निवडणूक रोखे खरेदी केले गेले. तर याच काळात 20,421 रोखे वटवले गेले. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून एकूण 22,217 निवडणूक रोख्यांची खरेदी केली गेली आणि त्यापैकी 22,030 रोखे वटवण्यात आले आहेत. 187 रोख्यांचे पैसे जे कोणी कॅश केले नाहीत, ते पीएम रिलीफ फंडमध्ये हस्तांतरित केले गेले.

सर्वोच न्यायालयाच्या तडाख्यानंतर एसबीआयने निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. ही माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे.
15 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली निवडणूक रोखे योजना रद्द केली होती. ही योजना घटनाविरोधी असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. तसेच 2019 पासूनची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने एसबीआयला दिले होते. यासाठी न्यायालयाने 6 मार्चपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर एसबीआयनं ही मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला. मात्र, हा अर्ज फेटाळत न्यायालयाने एसबीआयला चांगलेच फटकारले. तसेच 12 मार्च रोजी सायंकाळी 5 पर्यंत ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी ही माहिती बँकेने निवडणूक आयोगापुढे सादर केली आणि 15 मार्चपर्यंत ही माहिती आयोगाकडून त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे.

पेन ड्राइव्हमधून आयोगाला 2 फाईल्स दिल्या

आम्ही पेन ड्राईव्हमधील दोन फाईल्स निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. एका फाईलमध्ये निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांचा तपशील आणि रोखे खरेदीची तारीख आणि रक्कम नमूद आहे. दुसऱ्या फाईलमध्ये रोखे वटवणाऱ्या राजकीय पक्षांची माहिती आहे, असे एसबीआयने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.