2035 पर्यंत ‘भारत अंतराळ स्थानका’ची निर्मिती

0
7

>> केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती

भारताचे अंतराळ संशोधन अधिक व्यापक करण्यासाठी ‘भारत अंतराळ स्थानक’ (बीएएस) बांधण्यात येणार आहे. हे अंतराळ स्थानक अंतिम मंजुरी आणि अभियांत्रिकी टप्प्यात असून, 2035 पर्यंत ते बांधून पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी काल दिली.
विज्ञान मंत्रालयाच्या कामगिरीवर दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना जितेंद्र सिंह यांनी सरकारच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ उपक्रमांवर प्रकाश टाकला. आमचे स्वतःचे अंतराळ स्थानक असणार आहे. अमेरिका आणि एक-दोन देशांनंतर भारताचे स्थानक असेल. 2035 पर्यंत ते भारत अंतराळ स्थानक म्हणून ओळखले जाईल. यासोबतच 2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाठवण्याची योजना आहे, असेही त्यांनी सांगितले.

2026 च्या सुरुवातीला गगनयान महिमेअंतर्गत पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार आहे. तसेच, भारताने खोल समुद्र मोहिमेचा भाग म्हणून 6 हजार मीटरपर्यंत खोली शोधून समुद्रतळावर मानव पाठवण्याचीही यजना आखली असल्याचे सिंह यांनी सांगितले.
सध्याच्या सरकारच्या काळात उपग्रह प्रक्षेपणात झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवरही त्यांनी भर दिला. भारताने श्रीहरिकटा येथून 432 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. त्यापैकी 397 म्हणजे जवळपास 90 टक्के गेल्या दशकात प्रक्षेपित केले गेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
2030 च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सेवामुक्त होणार आहे. त्यामुळे भारतीय अंतराळ स्थानक आपल्या देशाला जागतिक लाभ देऊ शकतो.