देशव्यापी जनगणना सुरू होण्याचे संकेत आहेत. केंद्र सरकारने जनगणनेच्या तीन महिने आधी सर्व जिल्हे, शहर, तालुका तसेच गावांचे सीमांकन रोखण्यासंबंधीच्या आपल्या आदेशाची मुदत 30 जूननंतर वाढवलेली नाही. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार 2021 मध्ये होणारी जनगणना आता चार वर्षांनंतर 2025 च्या प्रारंभी प्रत्यक्षरीत्या सुरू होऊ शकते. या वर्षातील सहा महिन्यांच्या काळात प्रशासकीय यंत्रणेला जनगणनेसाठी तयार केले जाणार आहे. त्यानुसार जनगणना कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले जाईल. यंदा ही जनगणना डिजिटल स्वरूपात होईल. त्यात नागरिक स्वत:बद्दलची माहिती नोंदवू शकतील. त्यासाठी जनगणना कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण द्यावे लागेल. पहिल्या टप्प्यात देशातील घरांची गणना होईल. केंद्र सरकारने आधीच सुमारे 8.5 हजार कोटी रुपयांची तरतूद या कार्यक्रमासाठी केली आहे.