2023 साली काय कमावले, काय गमावले?

0
25
  • प्रमोद ठाकूर

राज्य मंत्रिमंडळ फेरबदल, पेडणे झोनिंग आराखडा, फेरीबोट तिकीट दरवाढप्रश्नी सरकारला घ्यावी लागलेली माघार, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्याचा आदेश, ध्वनिप्रदूषण, बेकायदा बांधकामांची दखल, वनक्षेत्रातील आग, कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे कोसळलेले छत या प्रमुख घटना सरत्या वर्षात घडल्या. त्यातच राज्यात जी- 20 बैठक, शांधाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक, 37 वी राष्ट्रीय क्रीडास्पर्धा या जमेच्या बाजूंचाही समावेश आहे. मावळत्या वर्षात राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभेचे सभापती आदी अतिमहनीय व्यक्तींनी राज्याला भेट दिली. मात्र सरत्या वर्षात अपघांत वाढ, अमलीपदार्थांचा सुळसुळाट आणि गुन्हेगारी घटनांची मोठ्या प्रमाणात नोंद झाली.

आज 31 डिसेंबर. या वर्षाचा शेवटचा दिवस. मावळत्या वर्षात अनेक बऱ्या-वाईट घटना घडून गेल्या. काही दीर्घ परिणाम करणाऱ्या तर काही अल्प परिणाम साधणाऱ्या. गोव्याच्या विविध क्षेत्रांत घडलेल्या घटनांचा हा थोडक्यात आढावा…
सरत्या वर्षात नोव्हेंबर 2023 मध्ये राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला. सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्या राजीनाम्यानंतर कॉँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली. मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा गेले वर्षभर सुरू होती. कॉँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांपैकी एका आमदाराला पहिल्या टप्प्यात राज्य मंत्रिमंडळात समावून घेण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येईल हे निश्चित होते. तथापि, विविध कारणांमुळे मंत्रिमंडळातील फेरबदलाचा विषय वर्षभर लांबणीवर पडत होता. आगामी 2024 च्या लोकसभेची निवडणूक जवळ येत असल्याने वर्षअखेरीस मंत्रिमंडळात फेरबदलाची कार्यवाही करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळातून सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांना वगळले जाईल हा विषय कधीच चर्चेत नव्हता. तथापि, अखेरच्या क्षणी नीलेश काब्राल यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्य मंत्रिमंडळातून नीळकंठ हळर्णकर, सुभाष फळदेसाई, गोविंद गावडे किंवा रवी नाईक यांपैकी एकाला वगळले जाण्याची चर्चा होती.
नागरिकांच्या विरोधामुळे पेडणे येथील नियोजित जमीन रूपांतराच्या नवीन झोनिंग आराखडाप्रश्नी राज्य सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. राज्य सरकारच्या नगरनियोजन विभागाने प्रादेशिक आराखडा तयार न करता तालुकानिहाय झोनिंग आराखडा तयार करण्याचे जाहीर केले होते. राज्यातील तालुक्यांच्या झोनिंग आराखड्याअर्तंगत पेडणे तालुक्याचा झोनिंग आराखडा सर्वात प्रथम जाहीर करण्यात आला. या आराखड्यात जमीन रूपांतरावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. या झोनिंग आराखड्याला पेडणे तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. मांद्य्राचे आमदार जीत आरोलकर यांनीही आराखडाप्रश्नी स्थानिक नागरिकांना पाठिंबा दर्शविला. लोकांचा विरोध असताना नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे झोनिंग आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत सुरुवातीला अगदी ठाम होते. मात्र नागरिकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना झोनिंग आराखडाप्रश्नी निवेदन सादर करून तो रद्द करण्याची मागणी केली आणि आगामी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता राज्य सरकारने हा आराखडा मागे घेण्याचे जाहीर करून वादावर पडदा टाकला.
राज्य सरकारच्या नदी परिवहन विभागाने जलमार्गावरील फेरीबोट शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. नदी परिवाहन खात्याने दुचाकी वाहनांसाठी शुल्क लागू करून नवीन शुल्कात 40 टक्के वाढ जाहीर केली होती. या फेरीबोट तिकिट दरवाढीला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने अखेर ही दरवाढ सरकारला मागे घ्यावी लागली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला व्याघ्र प्रकल्पप्रश्नी जोरदार दणका दिला. खंडपीठाने जुलै 2023 मध्ये तीन महिन्यांत म्हादई अभयारण्य व आसपासचा परिसर व्याघ्रक्षेत्र निश्चित करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आता सर्वोच्च न्यायालयात व्याघ्र प्रकल्पाचा प्रश्न पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या आव्हान याचिकेला अनुसरून केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे.
गोवा खंडपीठाने राज्यातील ध्वनिप्रदूषण आणि किनारी भागातील बेकायदा बांधकामांची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार ध्वनिप्रदूषणाला आळा बसावा म्हणून मोठ्या महोत्सवांना मान्यता देण्यासाठी खास विभागाची स्थापना करावी लागली आहे.

जुलै 2023 मध्ये घेण्यात आलेली राज्यसभा खासदार निवडणूक बिनविरोध पार पडली. राज्यातील विरोधी पक्षामध्ये केवळ सात आमदारांचा समावेश आहे. विरोधी पक्षातील सात आमदारांनी राज्यसभेसाठी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली.
मणिपूर राज्यातील दंगलीचे देशभरातील विविध भागांत पडसाद उमटले. गोवा राज्यसुद्धा याला अपवाद नव्हते. गोवा विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी मणिपूरप्रश्नी चर्चेची मागणी केली होती. तथापि, चर्चेला परवानगी दिली जात नसल्याने अनेकदा गदारोळसुद्धा केला. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांना विधानसभेच्या कामकाजात काही तासांसाठी उपस्थित राहण्यावर बंदीसुद्धा घालण्यात आली होती. याबाबत विरोधी आमदारांनी मणिपूर मुद्यावरून सभात्यागसुद्धा केला होता.

राज्यातील बाणस्तारी येथे अलिशान कारगाडीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघाताचे प्रकरण बरेच गाजले. या कारने सहा वाहनांना धडक दिल्याने तिघांचा मृत्यू आणि तिघे गंभीर जखमी झाले होते. याच अपघातप्रकरणी आम आदमी पार्टीचे गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांच्या अटकेचा मुद्दाही बराच गाजला. पोलिसांनी ॲड. पालेकर यांच्यावर अपघातप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवला आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने या अपघातप्रकरणी ॲड. पालेकर यांना अटक केल्याने खळबळ उडाली होती. मात्र फोंडा येथील जिल्हा न्यायालयाने ॲड. पालेकर यांना लगेच जामीन मंजूर करून दिलासा दिला.

राज्यात सरत्या वर्षात मोठ्या प्रमाणात वाहन अपघातांची नोंद झाली. सुमारे अडीशेच्या आसपास नागरिकांचा रस्ता-अपघातांत बळी गेला आहे. राज्यात तीन ठिकाणच्या तीन अपघातांत प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला आहे. बाणस्तारी येथे तिघांचा बळी गेला. त्यानंतर सांगे-तारीपाटो येथे कारगाडी नदीत कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर पर्वरी येथे भरधाव कारगाडी घसरून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या तपासात ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी गोव्याच्या परिसरात रेकी केल्याचे उघड झाले आहे. याबाबत स्थानिक पोलिस यंत्रणा अनभिज्ञ आहे. राष्ट्रीय तपास पथकाने फोंडा तालुक्यातील तिस्क-उसगाव येथील एका शालेय मुलाची देशविरोधी कारवायाप्रश्नी चौकशी केली आहे. सदर मुलगा मूळचा परराज्यातील असून गेल्या काही वर्षांपासून तो गोव्यात वास्तव्य करून आहे. सदर प्रकरणामध्ये तो मुलगा निर्दोष असल्याचे तपासात उघड झाले आहे.

राज्यातील विविध भागांत सरत्या वर्षात धार्मिक भावना दुखावण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले. कळंगुट येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय खूप गाजला. करासवाडा- म्हापसा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. सदर प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून तिघांना अटक केली. हिंदू देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल वाळपई, फोंडा पोलिस स्टेशनवर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. वास्को येथील ख्रिश्चन धर्मगुरू फादर बॉलमॅक्स परेरा यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी गुन्हा नोंद झालेला आहे. मुस्लीम धर्माबाबतही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने एका युवकाला अटक केली आहे.

सरत्या वर्षात घडलेल्या डिचोली येथील एका विद्यालयातील पेपर-स्प्रे प्रकरणामुळे खळबळ उडाली. या पेपर-स्प्रेची 12 मुलांना बाधा झाली होती. या प्रकरणात गुंतलेल्या विद्यार्थ्यांवर संस्थेतर्फे कारवाई करण्यात आली. शिक्षण खात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या गोवा दौऱ्यात ‘एसटी’ आरक्षणप्रश्नी बेजबाबदार वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. आदिवासी समाजातील नेत्यांनी केंद्रीय मंत्री आठवले यांच्या वक्तव्याचा निषेध करून माफीची मागणी केली होती. अखेर आठवले यांनी आपण चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्य केल्याचे जाहीर करून माफी मागितल्याने प्रकरण निभावले.
राज्यात ‘एसटी’च्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. आदिवासी समाजातील काही संघटनांनी एकत्र येऊन राजकीय आरक्षण मिळविण्याची मागणी धसास लावण्यासाठी आंदोलन सुरू करण्याची तयारी चालविली आहे. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ‘एसटी’ आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झालेली आहे. ‘एसटी’ समाजाला आगामी 2027 पूर्वी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी दिली.

राज्यात जैव संवेदनशील गावांचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आहे. केंद्र सरकारने पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात गोव्यातील 99 गावांचा समावेश करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्रीय तज्ज्ञांच्या समितीने मागील ऑक्टोबर महिन्यात काणकोण, सत्तरी या भागांत दौरा करून स्थानिक लोकांशी संवाद साधला. नागरिकांनी या समितीसमोर आपले गाऱ्हाणे मांडले, तसेच सरकारी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. पर्यावरण संवेदन क्षेत्रातून चाळीस गावे वगळण्याची मागणी केली जात आहे.

गोवा कला अकादमीची वास्तू नूतनीकरणाच्या कामामुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असताना 17 जुलै 2023 रोजी कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत अचानक कोसळल्याने आरोप-प्रत्यारोप झाले. साधारण तीन वर्षांनंतर कला अकादमीची वास्तू नोव्हेंबर 2023 मध्ये जनतेसाठी पुन्हा खुली करण्यात आली. कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामावर अंदाजे 50 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याने हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. कला अकादमीचा खुला रंगमंच विभाग वगळता इतर विभाग नोव्हेंबर महिन्यात खुले करण्यात आले आहेत.
सरत्या वर्षात अखेर ‘आयआयटी’च्या संकुलासाठी रिवण- सांगे येथील जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. स्थानिक आमदार, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई ‘आयआयटी’ संकुल सांगे तालुक्यात उभारण्यासाठी प्रयत्नशीर आहेत. ‘आयआयटी’ संकुलासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून जागेचा शोध घेतला जात होता. काणकोण, शेळ मेळावळी, सांगे येथे ‘आयआयटी’ संकुल स्थापन करण्यास विरोध झाला होता.
राज्यात ऑक्टोबर 2023 नंतर खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे वचन देण्यात आले होते. तथापि, अजूनपर्यंत खनिज व्यवसायाला सुरुवात झालेला नाही. राज्यातील 9 खनिज पट्ट्यांचा दोन टप्प्यांत लिलाव करण्यात आला आहे. खनिज पट्टे लिलावात घेतलेल्या खाण कंपन्यांकडून खनिज उत्खनन करण्यासाठी आवश्यक दाखले मिळविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. डिचोली, शिरगाव, माँत द शिरगाव, काले, अडवलपाल, करमळे, कुडणे, थिवी, सुर्ला येथील खनिजपट्ट्यांचा लिलाव करण्यात आला आहे. आता नवीन वर्षात खनिज व्यवसाय सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यात म्हादई पाणीप्रश्न मुख्य विषय आहे. म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयात म्हादईचा प्रश्न प्रलंबित आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेर आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती; मात्र याचिका सुनावणीला आलेली नाही.
मावळत्या वर्षात राज्यात जी-20 च्या आठ बैठका पार पडल्या. या बैठकांच्या पार्श्वभूमीवर विदेशातील काही राजकीय नेत्यांनी गोव्याला भेट दिली. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक गोव्यात पार पडली. या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनीही उपस्थिती लावली होती. जम्मू-काश्मीरमधील जवानांच्या हत्येमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री भुट्टो यांचे आगमन झाले होते. भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भुट्टो यांच्याशी संवाद साधला नाही.

गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेली 37 वी राष्ट्रीय क्रीडास्पर्धा पार पडली. या स्पर्धेत गोव्याने शंभरच्या आसपास पदके पटकावली. सरत्या वर्षात दिव्यांग व्यक्तींना व्यासपीठ देण्यासाठी आयोजित केलेला पहिला राष्ट्रीय पातळीवरील पर्पल महोत्सव पार पडला. या महोत्सवाची पंतप्रधान मोदी यांनीही दखल घेतली.
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी या वर्षी गोव्याला पहिल्यांदाच भेट दिली. त्यांनी गोवा विधानसभेत लोकप्रतिनिंशी संवाद साधला. तसेच, गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात संबोधित केले. फर्मागुडी-फोंडा येथे राष्ट्रपतींनी आपला ताफा वाटेत थांबवून महाविद्यालयीन मुलांशी संवाद साधला आणि सर्वांना अचंबित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी गोव्याला भेट दिली.

मार्च 2023 मध्ये वनक्षेत्रातील आग प्रकरण बरेच गाजले. राज्यातील वनक्षेत्रात विविध भागात दहा दिवस आगीचा वणवा सुरू होता. या आगीमुळे सुमारे 418 हेक्टर वनक्षेत्राची हानी झाली. या क्षेत्रातील वन्यजीवांवरही त्याचा परिणाम झाला. वनक्षेत्रात लागलेली आग विझविण्यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी लागली. आग विझविण्यासाठी हॅलिकॉप्टरचा वापर करावा लागला.
या वर्षात झुवारी नदीवरील आठ पदरी केबल स्टे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. गत 2022 साली या पुलाचा एक भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. वर्ष 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले होते. सरत्या वर्षात 5 जानेवारीपासून मोपा विमानतळावरून पहिल्या विमानाचे उड्डाण झाले.

या वर्षात राज्यात अपघात, गुन्हेगारीची अनेक प्रकरणे घडलेली आहेत. वाहन अपघातांत अडीचशेच्या आसपास व्यक्तींचा बळी गेला आहे. बुडून मृत्यूच्या अनेक घटनांची नोंद झाली आहे. खुनाची प्रकरणेही उजेडात आली आहेत. पर्वरी येथील युवतीचा प्रेम प्रकरणातून खून करून तिचा मृतदेह आंबोली येथे पुरण्यात आला. रूमडामळ- मडगाव येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून झाला. चरित्र्याच्या संशयावरून खुनाचे प्रकरण घडल्याचे उजेडात आले आहे. अमली पदार्थांचा विळखा वाढत आहे. सोने तस्करीची प्रकरणेही घडत आहेत. राज्यातील विद्यालयांमध्ये लैंगिक शोषणाची प्रकरणे घडत असल्याचे दिसून येत आहे.
एकूण हे वर्ष अनेक बऱ्या-वाईट घटनांनी गाजले. उद्या नवी आशा, नव्या अपेक्षा व नवा उत्साह घेऊन नवा सूर्य उगवणार आहे. येते वर्ष सर्वांना सुख-समाधाने वरदान ठरो हीच अपेक्षा!

  • प्रमोद ठाकूर