20 चोरांकडून 45 लाखांचे 60 मोबाईल फोन हस्तगत

0
19

पर्यटकांचे मोबाईल लुटण्याच्या हेतूनचे गोव्यात आलेल्या चार राज्यांतील चोरट्यांच्या टोळ्यांचा कळंगुट पोलीस आणि पर्यटन पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, सुमारे 20 संशयितांना अटक करण्यात यश मिळविले आहे. त्यांच्याकडून सुमारे 45 लाख रुपये किमतीचे 60 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.

मोबाईल चोरी प्रकरणामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि दिल्ली येथील तीन टोळ्या गुंतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नाताळपासून नववर्षापर्यंत हणजूण आणि कळंगुटमध्ये मोबाईल चोरीच्या सुमारे 200 तक्रारी दाखल झाल्या आहेत, असेही वाल्सन यांनी सांगितले. 31 डिसेंबरच्या दिवसभरात पोलिसांनी तीन टोळ्यांतील 20 जणांना अटक करत त्यांच्याकडून 60 मोबाईल हस्तगत केले.
कळंगुट, हणजूण व इतर भागात मोबाईल चोरी प्रकरणी आतापर्यंत एकूण 37 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 1.05 कोटीचे 90 फोन जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. गत वर्षीच्या तुलनेत सनबर्न आणि नववर्ष काळात फोन चोरीच्या घटनांत थोडी घट झाली, असेही वाल्सन म्हणाले.