2 वेगवेगळ्या स्वयंअपघातात दोघांचा मृत्यू

0
24

वास्को येथे दुचाकीला झालेल्या स्वयंअपघातात रसऑम्लेट गाडेधारकाचा मृत्यू झाला. सदर घटना रविवारी रात्री घडली. समीर गोसावी (52, रा. बेलाबाय-वास्को) असे मृत इसमाचे नाव आहे. तर बांबोळी येथे नियाझ रेस्टॉरंटजवळ रविवारी रात्रीच झालेल्या स्वयंअपघातात श्रीपाद मोरजकर (54 वर्षे) यांचा काल मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वास्कोतील एफ. एल. गोम्स मार्गावर शिवम थिएटरजवळ रविवारी रात्री हा स्वयंअपघात घडला. समीर गोसावी हे आपली दुचाकी (क्र. जीए-06-आर-4574) घेऊन वास्कोहून घरी जात असताना त्यांनी अचानक ब्रेक लावल्याने ते दुचाकीवरून उसळून खाली पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने उपचारासाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बेलाबायकडे जाणाऱ्या मार्गावर गोसावी यांचा रसऑम्लेटसह विविध खाद्यपदार्थांचा गाडा आहे. समीर रसऑम्लेट म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. ते एका दिव्यांग असल्याने चारचाकांची दुचाकी घेऊन फिरत असत. काल दुपारी तीन वाजता खारीवाडा येथे हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास वास्कोचे उपनिरीक्षक मयूर सावंत करीत आहेत.

बांबोळीतील स्वयंअपघातात वृत्तपत्र विक्रेत्याचा मृत्यू

पणजी (प्रतिनिधी) : बांबोळी येथे नियाझ रेस्टॉरंटजवळ झालेल्या स्वयंअपघातात श्रीपाद मोरजकर (54 वर्षे) यांचा काल मृत्यू झाला. मोरजकर हे बांबोळी येथून पर्वरीला जात असताना त्यांच्या दुचाकीला नियाझ रेस्टॉरंटजवळ अपघात झाला. त्यात मोरजकर गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मोरजकर हे वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय करीत होते. जुने गोवे पोलिसांनी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.