2 गटांतील हाणामारीत केपेचा नगरसेवक जखमी

0
11

केपे येथील तेलेगाळ-शिरवई येथे सोमवारी रात्री उशिरा दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेले केपेचे नगरसेवक चेतन हळदणकर यांच्यासह अन्य चार जण जखमी झाले. या प्रकरणी केपे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. हळदणकर यांच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत.

या प्रकरणी केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलेगाळ-शिरवई येथील संजय प्रभाकर चव्हाण यांची भाची दिव्या हिचे लग्न दोडामार्ग येथील विशाल जाधव याच्याशी झाले होते. दिव्याचे पालनपोषण मामानेच केले होते. पती विशाल हा आपल्याला दररोज मारहाण करत असल्याचे भाची दिव्या हिने मामा संजय चव्हाण यांना फोन करून सांगितले. भाचीने दिलेल्या माहितीनुसार मामा व अन्य काही जण दोडामार्ग येथे गेले व त्यांनी तेथील रविवारी पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल केली. दोडामार्ग पोलिसांनी प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न केला; मात्र नंतर जावयाच्या घरी गेल्यावर मामा आणि जावयाचा
वाद झाला.

यानंतर सोमवारी रात्री उशिरा विशाल जाधव हा दोडामार्ग येथील 16 जणांना घेऊन तेलेगाळ-शिरवई येथे आला आणि पत्नीच्या मामाच्या कुटुंबावर दगड व दंडुक्यानी हल्ला चढवला. यावेळी परिसर किंकाळ्यानी व आरडाओरडानी तंग झाल्यावर येथे जवळच रहाणारे नगरसेवक चेतन हळदणकर घटनास्थळी धावून गेले आणि त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यात ते जबर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत. तसेच अन्य चौघे जण जखमी झाले.
केपे पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून विशाल जाधव, विनोद जाधव, विलास चव्हाण, दिगंबर मोहिते व कमला जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला व त्यांना अटक केली. केपेचे पोलीस उपअधीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर अधिक तपास करीत आहेत.