18 वर्षीय गुकेश बुद्धिबळातील नवा विश्वविजेता

0
6

>> जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव; गुकेश ठरला बुद्धिबळाच्या पटावरचा ‘सर्वात युवा राजा’

भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश हा जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील नवा विश्वविजेता ठरला. गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून, तो जगातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा पराभव करत हे यश मिळवले. गुकेशला बक्षीस रुपात 2.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 21 कोटी रुपये एवढी रक्कम मिळाली आहे. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वनाथन आनंद याच्यानंतर डी. गुकेश हा आता भारताचा दुसरा विश्वविजेता खेळाडू ठरला आहे.
डी. गुकेश याने सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महाअंतिम सामन्यात काल डिंग लिरेन याच्यावर मात करत ही कामगिरी केली. 32 वर्षीय लिरेनने पहिला डाव जिंकला होता. त्यानंतर गुकेशने तिसरा डाव जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्सनी सलग सात डाव बरोबरीत सोडवले होते. 11व्या डावात गुकेशने विजय मिळवून बरोबरीची कोंडी सोडवली. 12व्या डावात लिरेनने बाजी मारली. अखेरचा डाव कोण जिंकणार की हा मुकाबला टायब्रेकरमध्ये जाणार याकडे बुद्धिबळ चाहत्यांचे लक्ष लागले होते. लिरेनच्या हातून झालेल्या घोडचुकीनंतर गुकेश विश्वविजेता होणार असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याच्या डोळ्यात विजयाश्रू तरळले. गुकेशने दमदार खेळ करत विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. सगळ्यात लहान वयाचा विश्वविजेता होण्याचा विक्रम आता गुकेशच्या नावावर नोंदवला गेला आहे. गुकेशने 14 डावांनंतर 7.5 आणि 6.5 अशा फरकाने लिरेनचा पराभव केला. गुकेशच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच सोशल मीडियावरुनही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सर्वात युवा विश्वविजेता
डी. गुकेश याने या विजयासह अनेक विक्रम रचले आहेत. गुकेश विश्वविजेता बनणारा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे. गुकेशने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. तसेच 12 वर्षांनंतर जगाला भारतीय विश्वविजेता मिळाला आहे. गुकेश याच्याआधी 2012 साली विश्वनाथन आनंद हे बुद्धिबळात विश्वविजेते ठरले होते.

कोण आहे डी गुकेश?
डी. गुकेश यांचे पूर्ण नाव डोम्माराजू गुकेश असून, तो चेन्नईचा रहिवासी आहे. गुकेशचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. त्याने वयाच्या 7 व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले. नागय्या हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहेत. त्यांच्यानंतर विश्वनाथन आनंद यांच्या अकादमीतून बुद्धिबळाचे बारकावे शिकून घेतले. गुकेशने वर्ल्ड चॅम्पियन होण्याआधी अनेक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. गुकेशचे आई आणि वडील दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्याची आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, तर वडील डॉक्टर आहेत.

विजयानंतर डी. गुकेश काय म्हणाला?
सामन्यात जेव्हा मला कळले की डिंग लिरेनने घोडचूक केली आहे, तो माझ्या जीवनातील खूप आनंदाचा क्षण होता. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लिरेन उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने या सामन्यादरम्यान शेवटपर्यंत हार न मानता दाखवून दिले की खरा चॅम्पियन कसा असतो. विजयानंतर मी जो क्षण अनुभवतो आहे तो अनुभवण्याचे प्रत्येक बुद्धिबळपटूचे स्वप्न असते आणि आज मी माझे स्वप्न जगतो आहे. सर्वात आधी देवाचे खूप आभार, अशी प्रतिक्रिया बुद्धिबळातील नवा विश्वविजेता डी. गुकेश याने दिली.