18 व्या लोकसभेच्या अधिवेशनास प्रारंभ

0
17

>> मोदींसह विविध नेत्यांनी घेतली शपथ, विरोधकांची निदर्शने

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन काल सोमवारपासून सुरू झाले. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासगह राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज चौहान, मनोहरलाल खट्टर तसेच केंद्रीय मंत्र्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यावेळी संसद भवनात विरोधकांनी जोरदार निदर्शने केली. त्यांनी सरकारवर संविधान मोडल्याचा आरोप केला. लोकसभेत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांना आपल्या हातात असलेल्या संविधानाच्या प्रती दाखवल्या.

शिक्षणमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान शपथ घेण्यासाठी उठताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी नीट-नीट अशी घोषणाबाजी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शपथ घेणार असताना सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी ही बेंच वाजवला.
संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी इंडिया आघाडीचे सर्व खासदार संसद भवनातील गांधी पुतळ्यासमोर जमले होते. यावेळी त्यांनी संविधानाची प्रती हातात घेऊन सरकारचा निषेध केला.

लोकसभा अध्यक्षपदाची बुधवारी होणार निवड
संसदेच्या अधिवेशनात उद्या बुधवार 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. आज 25 जून रोजी रालोआ आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर करेल. मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच रालोआचा उमेदवार जाहीर होईल.

श्रीपाद नाईक यांनी घेतली संस्कृतमधून शपथ
उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी 18 व्या लोकसभा सदस्यत्वाची शपथ संस्कृत भाषेतून घेतली. तर, दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ कोकणी भाषेतून घेतली.

मोदींचे आवाहन
18व्या लोकसभेच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत असून 4 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालेल. त्यानंतर ते स्थगित होऊन दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा 22 जुलैपासून सुरू होईल. या अधिवेशनाच्या सुरुवातीला प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी बोलताना एकीकडे विरोधकांकडून सहकार्य आणि जबाबदार वागणुकीची अपेक्षा ठेवली असताना दुसरीकडे त्यांनी आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसवर टीकास्र सोडले आहे. तसेच देशाला संसदेत घोषणाबाजी नको असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.