संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती; कारण गुलदस्त्यात
केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून, हे अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणार आहे, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवरून काल दिली. या अधिवेशनात 10 हून अधिक महत्त्वाची विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली; मात्र ही विधेयके नेमकी कुठली आहेत, ते स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या विशेष अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवरून चर्चा होणार याबाबत देखील अद्याप खुलासा केंद्र सरकारकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चर्चेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच 11 ऑगस्टला संपले. मणिपूर हिंसाचार, महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी पावसाळी अधिवेशन गाजवले. याच मुद्द्यांवरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता. तो आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आता अवघ्या दीड महिन्यातच पुन्हा एकदा केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. आणि ते 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन (17 व्या लोकसभेचे 13 वे अधिवेशन आणि राज्यसभेचे 261 वे अधिवेशन) 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत बोलावले आहे. या अधिवेशनात पाच बैठका होणार आहेत. अमृत काल दरम्यान संसदेत महत्त्वाची चर्चा होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती प्रल्हाद जोशींनी काल दिली. मात्र जोशी यांनी या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यावरून चर्चा होणार याबाबत माहिती दिलेली नाही.
9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत जी 20 शिखर परिषद होणार आहे. या परिषदेनंतरच या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे; पण या अधिवेशनाचा उद्देश अद्याप केंद्र सरकारकडून उघड करण्यात आलेला नाही.