17 दिवसांनंतर सर्व मजुरांची सुटका

0
20

>> उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकले होते 41 कामगार

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 मजुरांची अखेर सुटका करण्यात आली. हे कामगार गेले 17 दिवस या बोगद्यात अडकले होते. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिकांचा ताफा आणि तात्पुरते रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले आहे.
उत्तराखंडच्या सिल्क्यारा-दांदलगाव बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना अखेर काल 17 दिवसांनंतर सुखरुप बाहेर काढण्यात आले. काल मंगळवारी सायंकाळी 7 च्या दरम्यान बोगद्यात अडकलेल्या कामगारांपैकी विजय होरी यांना प्रथम बाहेर काढण्यात आले. यानंतर गणपती होरी यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर उर्वरीत सर्व मजुरांना त्यापाठोपाठ बाहेर काढले गेले. या कामगारांसाठी रॅट मायनिंग करणारे देवदूत म्हणून आले. बोगद्याच्या बाहेर येताच कामगारांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. या सर्व मजुरांना रुग्णालयात हलवण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी बाहेर काढलेल्या कामगारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री व्ही. के. यांची उपस्थिती होती. बोगद्याच्या आत बांधलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात कामगारांची प्रथम तपासणी केली गेली. त्यानंतर त्यांना जवळच्या सामूदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

12 नोव्हेंबर रोजी निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे बोगद्यात काम करणारे 41 मजूर आत अडकले होते.
शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी कामगारांच्या ठिकाणापूर्वी केवळ 12 मीटर आधी मशीनचे ब्लेड तुटले. त्यामुळे बचावकार्य थांबवावे लागले. 16 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी 86 मीटर लांबीचे व्हर्टिकल ड्रिलिंग करण्यात आले.

17 दिवसांपासून बोगद्यात
गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून हे 41 मजूर बोगद्यात अडकले होते. बोगद्याचे काम सुरू असताना बोगदा कोसळल्यामुळे मजूर आत अडकून होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात देशासह जगाच्या नजरा या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागल्या होत्या. प्रथम दोन कामगांरांना बाहेर काढले. नंतर इतरांनाही बाहेर काढण्यात आले. या बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरते रुग्णालय तयार ठेवण्यात आले. तसेच या ठिकाणी रुग्णवाहिकाही तयार ठेवण्यात आली होती. बांधकामाच्या ठिकाणाहून मुख्य रुग्णालय हे 30 किमीच्या अंतरावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी बांधकामाच्या ठिकाणीच तात्पुरत्या रुग्णालयाची सोय करण्यात आली.

विविध संघटना
कामगारांच्या सुटकेसाठी देशभरातील विविध यंत्रणा उत्तराखंडमध्ये एकवटल्या. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जे प्रकल्प बांधत आहेत आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस, यासह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी झाल्या होत्या.
मुख्यमंत्री धामी यांनी बचाव कार्यात असलेल्या कामगार आणि जवानांच्या मनोबलाचे आणि धैर्याचे कौतुक केले.

जिद्दीला सलाम ः मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचाव कार्यात सामिल असलेल्या सर्वांच्या जिद्दीला आणि धैर्याला सलाम करतो असे म्हटले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सर्व मजुरांचे अभिनंदन केलं आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीम वर्कचे एक अद्भुत उदाहरण समोर ठेवले असल्याचे पंतप्रधान म्हणाले.