16 हजार चौ. मी. कृषी जमिनीचे रुपांतर

0
5

>> टीसीपी कायद्याच्या 17 (2) अंतर्गत तरतुदींचा वापर करून जमीन रुपांतराचा सपाटा

नगरनियोजन खात्याने टीसीपी कायद्याच्या 17 (2) अंतर्गत तरतुदींचा वापर करून प्रादेशिक आराखडा 2021 मधील नैसर्गिक आच्छादन आणि भातशेतीच्या जमिनीचे सेटलमेंट झोनमध्ये रुपांतर करण्याचा सपाटा लावला आहे. टीसीपी कायद्यांतर्गत तरतुदींचा वापर करून नैसर्गिक आच्छादन आणि भातशेती म्हणून नोंद असलेली आणखीन 16,039 चौरस मीटर जमिनीची सेटलमेंट झोनमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

नगरनियोजन विभागाने टीसीपी कायद्याच्या 17 (2) अंतर्गत तरतुदींचा वापर करून प्रादेशिक योजना 2021 मध्ये राज्यातील 4 वेगवेगळ्या ठिकाणी 16,039 चौरस मीटर क्षेत्राचे क्षेत्र ‘दुरुस्त’ केले आहे. याबाबतची अधिसूचना विभागाकडून सरकारी पत्रकातून जारी करण्यात आली आहे.

आरपीजी-2021 नुसार नैसर्गिक कव्हर झोन म्हणून निश्चित केलेले आसगाव गावातील 10,100 चौरस मीटर हे सेटलमेंट झोन म्हणून ‘दुरुस्त’ करण्यात आले आहे. डेसुआ- सासष्टी येथील 1318 चौरस मीटर क्षेत्रफळ भातशेतीपासून सेटलमेंट झोनमध्ये बदलण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ऑशेल, बार्देश येथील 2787 चौरस मीटर जमीन पाटबंधारे कमांड क्षेत्रासह भातशेती म्हणून निश्चित करून सेटलमेंट झोन म्हणून दुरुस्त करण्यात आली आहे. आरपीजी-2021 नुसार भातशेती म्हणून निश्चित केलेली कवळे फोंडा येथील 1,834 चौरस मीटरची आणखी एक जमीन सेटलमेंट झोन म्हणून दुरुस्त करण्यात आली आहे.

नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रादेशिक आराखडा 2021 बाबत केलेली वक्तव्ये हा चर्चेचा विषय बनली आहेत. प्रादेशिक आराखडा 2021 हा मोठा घोटाळा आहे, असा आरोप राणे यांनी केला होता. प्रादेशिक आराखड्यात घोटाळा करून काही नागरिकांच्या जमिनीचे नैसर्गिक कव्हर, भातशेतीमध्ये रुपांतरित करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्या नागरिकांना न्याय देण्यासाठी टीसीपीच्या कलम 17 (2) चा वापर केला जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.