>> मोदी सरकारच्या विनवणीनंतर ‘सर्वोच्च’ निर्णय
केंद्र सरकारने मागणी केल्याप्रमाणे आता सक्तवसुली संचालनायाचे (ईडी) संचालक संजय कुमार मिश्रा यांना अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काल घेतला. संजय मिश्रा यांना ईडीचे संचालक म्हणून 15 सप्टेंबरपर्यंत मुदतावाढ देण्यात आली आहे. मिश्रा हे फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्सच्या पुनर्रचनेच्या प्रकियेत सहभागी असल्याने राष्ट्रीय हितासाठी त्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारने न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.
संजय कुमार मिश्रा यांचा ईडी संचालक म्हणून कार्यकाळ 31 जुलै रोजी संपणार होता. यापूर्वी 11 जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मिश्रा यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवण्याचा केंद्राचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांना 31 जुलै रोजी त्यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश मोदी सरकारला दिला होता. तसेच केंद्र सरकारने नवीन ईडी संचालकांची निवड करावी, असाही आदेश दिला होता.
त्याआधी देखील 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवू नये, असे आदेश दिले होते. त्यानंतरही त्या आदेशाला न जुमानता नवीन तरतूद करत मोदी सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या मुदतवाढीला आक्षेप घेतला होता.