>> केबल ऑपरेटर्स आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांना वीज खात्याचा निर्वाणीचा इशारा
वीज खात्याने केबल ऑपरेटर्स आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, 15 दिवसांच्या आत वीज खांबावरील केबल्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिला.
वीज खांबांचा गैरवापर केलेल्या प्रकरणी जिओ डिजिटलला 3.4 कोटी आणि ब्लीट्झ ग्लोबलला 1.80 कोटी रुपयांचा दंड वीज खात्याने ठोठावला आहे. तसेच, अन्य काही ऑपरेटरना दंड ठोठावण्यात आला असून, दंडाची एकूण रक्कम 50 कोटीच्या आसपास जाण्याची शक्यता आहे, असे काशिनाथ शेट्ये यांनी सांगितले.
वीज खांबांवर केबल घालण्यासाठी सुमारे 50 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जदारांना मागील पाच वर्षांतील शुल्क भरण्याची सूचना करण्यात आली आहे. केबल आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांना केबल काढून टाकण्यासाठी शेवटच्या 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही शेट्ये यांनी सांगितले.
केबलवरील पुढील कारवाईसाठी साहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता जबाबदार असतील आणि त्यांनी कारवाई न केल्यास त्यांना दररोज 300 रुपये दंड आकारला जाईल, जो त्यांच्या पगारातून कापला जाईल, असे त्यांनी सांगितले.
काही ऑपरेटरनी खांब वापरण्यासाठी परवानगीसाठी अर्ज केले आहेत, परंतु त्यांना अद्याप परवानगी दिलेली नाही. ऑपरेटरांना विशिष्ट रंगाचे केबल वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. दंड आकारण्यासाठी वीज विभागाने ऑपरेटरकडून यादी मागवली होती. ऑपरेटरांनी सादर केलेली यादी अपुरी आहे. कोणत्याही अपघात आणि जीवितहानीची जबाबदारीही या ऑपरेटर्सनी घेतली पाहिजे, असेही शेट्ये यांनी सांगितले.
गोवा केबल टीव्ही नेटवर्किंग आणि सर्व्हिस प्रोव्हायडर्स असोसिएशनची याचिका गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली, त्यामध्ये वीज विभागाला अनधिकृत केबल्स तोडण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली होती. कोणत्याही बेकायदेशीर इंटरनेट आणि टीव्ही केबल्स कापण्यास विभाग स्वतंत्र आहे, असा निकाल न्यायालयाने दिला होता.