राज्यातील अंदाजे 130 कोटी रुपयांच्या आर्थिक गुंतवणूक घोटाळ्याचे तपासकाम गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेकडून गुन्हा शाखेकडे हस्तांतरित करण्याचा आदेश काल जारी करण्यात आला.
अंदाजे 130 कोटी रुपयांच्या शेअर गुंतवणुकीच्या घोटाळ्याबाबत आर्थिक गुन्हा विभागाकडे तक्रार करण्यात आलेली आहे. आर्थिक गुन्हा विभागाकडून या घोटाळ्याची चौकशी केली जात असताना, आता सदर प्रकरण गुन्हा शाखेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हा विभागाने नोंदविलेल्या या आर्थिक गुंतवणूक घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल आणि अधिक व्यावसायिक तपास करण्यासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येत आहे, असे पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा (आयपीएस) यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
मायरॉन रॉड्रिग्स आणि त्यांची पत्नी दीपाली परब हे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील गुंतवणुकीतून उच्च परतावा देण्याचे आमिष त्यांनी दाखवले आणि त्यांच्या पैशांचा गैरवापर केला. मायरॉन रॉड्रिग्स याने विदेशात पलायन केले आहे. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केलेली आहे. या प्रकरणी बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याशिवाय या प्रकरणी आणखी सात जणांच्या विरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.