गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने 130 कोटींच्या फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी विदेशात पळून जाऊ नये म्हणून 7 संशयितांच्या विरोधात लूकआउट परिपत्रक (एलओसी) काल जारी केले.
आर्थिक गुन्हा विभागाने फातोर्डा मडगाव येथील एका 123 कोटींच्या फसवणूक प्रकरणात संशयित आरोपी मायरॉन रॉड्रिगीस आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. मुख्य संशयित आरोपी मायरॉन रॉड्रिगीस याच्याविरोधात एलओसी आणि ब्लू कॉर्नर नोटीस यापूर्वीच जारी केली आहे. मायरॉन याने लंडन येथे पलायन केले आहे.
या प्रकरणातील अन्य संशयित आरोपींनी विदेशात पलायन करू नये म्हणून आर्थिक गुन्हा विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून एलओसी जारी केली आहे. एलओसी जाहीर केलेल्यामध्ये संशयित आरोपी दीपाली बाळकृष्ण परब, सुनीता रॉड्रिग्स, नोलन लॉरेन्स आंताव, जोकिम रोझारियो पायर्स, विजय दत्तात्रय जॉयल, नवनिक मारिओ अरमांडो परेरा आणि सुशांत मनोहर घोडगे या सात जणांचा समावेश आहे. त्यांना देशातून बाहेर पळून जाण्यापासून रोखण्यासाठी आणि तपासासाठी पोलिसांसमोर हजर करण्यासाठी एलओसी जारी करण्यात आली आहे.